प्रमुख पक्षांकडून संधी नाही
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला विविध क्षेत्रात काम करीत असल्याचे बोलले जाते. मात्र विधानसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देण्याकडे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध प्रमुख राजकीय पक्षांनी साफ दुर्लक्ष केले आहे. शहर व जिल्ह्य़ातील बारा मतदारसंघात संघ मिळून १४६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात केवळ १५ महिलांचा समावेश आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्षांकडून मात्र एकाही महिला उमेदवाराला संधी देण्यात आलेली नाही. जिल्ह्यत महिला उमेदवारांचे प्रमाण दहा टक्के आहे. विशेष म्हणजे, महिलांना उमेदवारी नाकारणाऱ्या पक्षांच्या विरोधात एकही महिला संघटना अद्याप समोर आलेली नाही.
राजकारणामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याची केवळ घोषणा करण्यात आली मात्र निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांकडून त्याची अंमलबजावणी झाली नाही. गेल्या काही वर्षांत राजकारणात महिलांचे प्रमाण वाढले. पण सभागृहात त्यांचा वाटा असावा, याबाबत प्रमुख राजकीय पक्ष या विधानसभा निवडणुकीत फारसे गंभीर दिसत नसल्याचे समोर आले आहे. बाराही मतदारसंघात केवळ १५ महिला उमेदवार आहेत. त्यात बहुतेक अपक्ष आणि ज्या राजकीय पक्षाचे अस्तित्व फारसे नाही अशा पक्षांकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शहरात पूर्व नागपूर व जिल्ह्य़ातील कामठी व रामटेक मतदारसंघात एकही महिला निवडणुकीच्या रिंगणात नाही.
भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, वंचित आघाडी या प्रमुख राजकीय पक्षासह इतर पक्षांमध्ये शहरात उच्चशिक्षित आणि राजकारणात आवड असणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली मात्र त्यांना नाकारण्यात आले. बहुतेक मतदारसंघात विद्यमान आमदारांनी उमेदवारी देत महिलांना डावलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. त्यात केवळ ३ महिलांचा समावेश आहे. त्यात धर्मशीला भारद्वाज, रिता सिंग व ज्योत्स्ना अडकने तिघीही अपक्ष उमेदवार आहेत.
दक्षिण नागपुरात १७ उमेदवार आहेत, त्यात बहुजन मुक्ती पक्षाच्या राजश्री इंगळे, मध्य नागपूरमध्ये एकूण १३ उमेदवार असून त्यात राष्ट्रीय जनसंभावना पक्षाकडून नंदा बोकडे व अपक्ष कमल गौर, उत्तर नागपुरातून १४ उमेदवार असून त्यात राष्ट्रीय जनसंभावना पक्षाच्या अर्चना उके, राष्ट्रीय किसान बहुजन पक्षाच्या यामिनी देवकर आणि आंबेडकर पार्टी ऑफ इंडियाच्या अॅड. विजया बागडे, पश्चिममध्ये १२ उमेदवार असून त्यात अपक्ष उमेदवार बबिता अवस्थी, सोनाली भलावी, काटोलमध्ये १० उमेदवार असून त्यात बहुजन मुक्ती पक्षाच्या माधुरी गजभिये, सावनेरात ८ उमेदवार असून त्यात बहुजन समाज पक्षाच्या संचयना पाटील, हिंगण्यात १२ उमेदवार आहेत तर त्यात सोशालिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडियाच्या माधुरी राजपुत, उमरेडमध्ये ११ उमेदवार असून त्यात राष्ट्रीय जनसंभावना पक्षाच्या मीना वारकर या महिलांचा समावेश आहे.
राष्ट्रीय पक्षांमध्ये केवळ बसपाने सावनेरमध्ये एका महिलेला उमेदवारी दिली आहे. विविध राजकीय पक्षांच्यावतीने पक्ष संघटनेच्या कामात त्या सहभागी होतात. मात्र कुठल्याही राष्ट्रीय पक्षांनी त्यांची दखल घेतली नाही त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.