शेतमजुरांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची संधी
गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाची आवड असते, मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यांना रोजगार शोधावा लागतो. पालकही मुलांना उद्योगात कामासाठी पाठवतात. शिक्षणीची आवड असलेल्या गरीब कुटुंबातील मुलांसाठी विद्यादान सहायक मंडळ आशेचे किरण बनले आहे. समाजातील गरीब, गरजू, गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना खात्रीचा मंडळ मदतीचा हात देत आहे. ठाण्यामध्ये प्रारंभ झालेल्या या संस्थेची नागपुरात शाखा सुरू करण्यात आली. नागपूरसह गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा येथील १७ होतकरू आणि गरजू विद्याथ्यार्ंना विद्यादानासाठी आर्थिक सहाय्य करत समाजासाठी आदर्श नागरिक घडविण्याचे काम मंडळाकडून होत आहे.
सात वर्षांपूर्वी खेडय़ातील सात ते आठ विद्यार्थ्यांपासून सुरू केलेल्या या विद्यादानात ४०० विद्याथ्यार्ंना मंडळाने आधार दिला असून सध्या २५० च्या आसपास विद्यार्थ्यांसाठी विद्यादानाचे कार्य सुरू आहे. त्यापैकी अनेक विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, प्रशासकीय सेवेत कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून संस्थेला हातभार लागतो. या संस्थेशी प्रारंभापासून संलग्न असलेल्या आणि अनेक वर्षे ठाण्यात वास्तव्यास असलेल्या मूळच्या वैदर्भीय माधुरी इंगोले या नागपुरात स्थायिक झाल्या. त्यांनी संस्थेची शाखा नागपुरात स्थापन केली. विदर्भातील विविध जिल्ह्य़ांतील एकूण १७ विद्यार्थी संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. मुलांना केवळ शिक्षण द्यावयाचे नसून त्यांचा सवार्ंगीण विकास करून देशाचे उत्तम नागरिक घडविणे हा उद्देश आहे. यावर्षी सात विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी गोरगरीब असून त्यातील काही मुलांचे पालक शेतमजूर आहेत. काही विद्यार्थी अभियांत्रिकी, बीएससी आणि एमफार्म आदी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत आहेत. त्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च संस्था करते, असे इंगोले यांनी सांगितले.
आवश्यकता भासल्यास पालकांचे समुपदेशन करतो. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी एकत्र येतात आणि त्यांना मार्गदर्शन केले जाते. वर्षभर अशा विविध कार्यक्रमाची रूपरेषा संस्थेने ठरवून दिली आहे. एका विद्यार्थ्यांमागे साधारणत: ३० ते ३५ हजार रुपये खर्च येतो. हा सर्व दानदात्याच्या माध्यमातूनच केला जातो. आमच्याकडे असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला संस्थेविषयी आणि आमच्याविषयी आपलेपणा वाटत असतो.