नागपूर: तीस -चाळीस वर्षापासून राहणाऱ्यांचे भूखंड नियमीत केले जात नाही, मात्र क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या जागेवर एका बांधकाम व्यावसायिकाने केलेले अतिक्रमण नागपूर सुधार प्रन्यास नियमीत करते, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत महापालिका, नागपूर सुधार प्रन्यासला लक्ष्य केले. ठाकरे यांनी कोणाचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख कोणाकडे होता याची नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ठाकरे म्हणाले, नागपूर सुधार प्रन्य्स खेळाच्या मैदानावर बिल्डरांच्या अनधिकृत भूखंडांचे नियमितीकरण करते, पण शेकडो गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांचे भूखंड नियमित करण्याकडे दुर्लक्ष करते. नागपूर महापालिकेचे अधिकारी गरीब फेरीवाल्यांचे सामान जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात, मात्र सरकारी संस्थांच्या जमिनींवरील प्रभावशाली व्यक्तींच्या अतिक्रमणाकडे प्रशासन डोळेझाक करत आहे. महापालिकेचे एमडीएस पथक लोकंकडून पैसे वसूल करते, अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहे. निधी नसल्याने कामे रखडली आहे. अधिकाऱ्यांचा वचक उरला नाही. महापालिका, पंजाबराव कृषी विद्यापीठ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे अतिक्रमण काढावे, असा ठराव महापालिकेने पाच वर्षापूर्वी केला होता. त्याला शासनाने स्थगिती दिली. या जागेवर अनेक हॉटेल्स उभी आहेत. रोज हजारो लोक तेथे जातात, तेथे काही दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ? असा सवाल ठाकरे यांनी केला. नागपूर हे मु्ख्यमंत्र्यांचे शहर आहे. तेथेच ही अवस्था असेल तर इतर शहरांबाबत न बोलले बरे, नगर विकास खात्याने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिका-यांवर जोरदार टीका केली. या अधिका-यांनी लूट सुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. अधिका- यांचे वाहनं चालक फुटकळ विक्रेत्यांकडून खंडणी गोळा करतात असा गंभीर आरोपही ठाकरे यांनी केला.