Viral Video of Tiger chased Dog in Tadoba: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे पर्यटकांसाठी सहज होणाऱ्या व्याघ्रदर्शनाची पर्वणीच! जगभरातील लोकांची ताडोबा म्हणजे पहिली पसंती आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातच वाघ दिसत होता. त्यामुळे पर्यटकांचा ओढा याच व्याघ्रप्रकल्पाकडे होता.

अलीकडच्या काही वर्षात मात्र गाभा क्षेत्रासोबतच बफरक्षेत्रातही व्याघ्रदर्शन होत आहे. किंबहुना गाभा क्षेत्राबाहेरच्या सर्वच क्षेत्रात सहज व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटकांचा ओढा गाभा क्षेत्रापेक्षा बफर क्षेत्राकडे अधिक आहे. अगदी सेलिब्रिटी देखील बफर क्षेत्राला पहिली पसंती देतांना दिसून येतात. मात्र, हे बफर क्षेत्र चर्चेत आले आहे ते गावातील श्वानाच्या उपस्थितीने.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या मदनापूर बफर क्षेत्रात ही घटना उघडकीस आली. क्षणार्धात हा व्हिडिओ इन्स्टाग्राम, व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक अशा समाज माध्यमावर व्हायरल झाला. ताडोबाच्या मदनापूर बफर क्षेत्रालगत अनेक गावे आहेत आणि या गावांमधूनच हा श्वान भटकत आला असावा अशी शक्यता आहे. हा श्वान जंगलात भटकत असताना वाघ आपल्या मागावर असल्याची जराही कल्पना त्या श्वानाला आली नाही. त्या श्वानाने जंगलात तर प्रवेश केला, पण त्याला बाहेर पडता येईना. त्यामुळे तो गावाकडचा मार्ग शोधत इकडेतिकडे भटकत होता.

ताडोबातील श्वान आणि वाघाचा व्हिडीओ व्हायरल

वाघाला ते आपले सावज वाटल्याने वाघ दबक्या पावलाने आपल्या सावजाचा पाठलाग करत होता. मात्र, नकळतपणे श्वान त्याला गुंगारा देऊन जात होता. एका क्षणाला तो श्वान वाघाच्या नजरेच्या टप्प्यात आला. वाघाने त्याच्यावर झडप घालण्यासाठी पवित्रा घेतला आणि अचानक वाघांची पावलं जागेवर थबकली. तेवढ्यात त्या श्वाननेही तिथून काढता पाय घेतला. ही घटना पर्यटकांसाठी करमणुकीची असली तरीही ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पासाठी तेवढीच धोकादायक आहे.

मुळात व्याघ्रप्रकल्पात वाघ शिरतोच कसा हा प्रश्न याठिकाणी उपस्थित झाला आहे. यावरून ताडोबाच्या बफर क्षेत्रातील व्यवस्थापनावर देखील अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्राला लागून अनेक गावे आहेत. अनेकदा वन्यप्राणी जंगलाची सीमा ओलांडून गावात गेल्याचेही आपण पाहिले आहे. मात्र, गावातून श्वान जंगलात येणे म्हणजे वन्यप्राण्यांसाठी तर तर धोकादायक आहेच, पण व्याघ्रप्रकल्पाच्या गांभीर्यावर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.