लोकसत्ता टीम

अकोला : हिवाळा लागताच पाणवठ्यावर येणाऱ्या विदेशी पाहुण्या पक्ष्यांचे विशेष आकर्षण असते. यंदा मात्र जलाशयांना अद्यापही स्थलांतरित पाणपक्ष्यांची प्रतीक्षा लागली आहे. काही झुडुपी पक्ष्यांनी हजेरी लावली आहे, अशी माहिती ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांनी दिली.

थंडीची चाहुल लागताच परिसरातील जलाशयांवर स्थलांतरित पक्षी डेरेदाखल होत असतात. या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी अभ्यासकांची गर्दी होते. दरवर्षी पक्षीमित्रांना पाहुण्या पक्ष्यांच्या आगमनाची उत्सुकता असते.

हवाई मार्गे हजारो कि.मी.चा प्रवास करून आपल्या परिसरातील पाणवठ्यांवर येणाऱ्या रंगीबेरंगी, स्थलांतरीत, चिमणी एवढ्या धोबी पक्षापासून ते उंच, देखण्या करकोचांची, बदकांची, शिकारी पक्षांची, झुडपी खग आदी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. विविध तर्हेचे हे द्विजगण भारतभर पसरतात. अनुकुल प्रदेश आढळताच त्याठिकाणी ते पक्षी विसावतात. पोट पुजेसाठी सर्वदूर पक्ष्यांचे थवे विखुरतात. निसर्गाने त्यांना विविधतेने नटवलेले असतेच. ही पक्षी संपदा पक्षी मित्रांना भुरळ घालत असते. त्या पक्ष्यांना निहाळण्यासाठी पक्षी मित्र हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत पंचक्रोशीतील पाणवठे पालथे घालतात.

आणखी वाचा-बुलढाणा : मिरवणुकीत फटाके फोडल्यावरून वाद, धाडमध्ये दंगल

परिसरातील अनेक जलाशयावर हिवाळ्यात हे द्विजगण दरवर्षी हजेरी लावतात. यावर्षी काही पक्षी अकोला शहरातील आवडत्या ठिकाणांना, आजुबाजुच्या पाणवठ्यांना भेटी देत आहेत. पण अद्याप स्थलांतरित पाहुण्यांचे आगमन झालेले नाही. त्यामुळे पाणवठ्यांना सुद्धा पक्ष्यांची प्रतीक्षा लागली आहे. निसर्गदूत परिसरात कधी अवतरतात यांची उत्कंठा लागली आहे. काही झुडुपी स्थलांतरीत पक्षांनी हजेरी लावली आहे.

त्याबरोबर स्थानिक पक्ष्यांना न्याहाळणे हा आनंदसोहळा पक्षी मित्रांना सुखावतो आहे. कुंभारी जलाशय, कापशी तलाव, आखातवाडा, मोर्णा धरण, चेल्का पाणवठ्यांना भेटी दिल्यावर स्थलांतरित पक्षांनी अद्याप हजेरी लावलेली नसल्याचे आढळून आले आहे, असे ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांनी सांगितले. यावेळी पक्षीमित्र डॉ.अतुल मुंदडा, डॉ.सतीश पडघन, निलेश पडघन, श्रीकांत वांगे, सुभाष पडघन, अनुल मनवर आदींनी पाणवठ्यांवर निरीक्षण केले.

आणखी वाचा-गडचिरोलीला मंत्रिपद निश्चित! कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अकोल्यात १५९ प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद

अकोला जिल्ह्यात एकूण १५९ प्रजातींचे पक्षी हिवाळी पाहुणे म्हणून येतात. यात पाणथळीच्या पक्ष्यांबरोबरच माळरानावरचे, शाखारोही आणि शिकारी पक्षीही असतात. पाणपक्ष्यांमध्ये विविध प्रकारची बदके, पाणथळीत पोटपुजा करणारे पक्षी दाखल होतात. तसेच गप्पीदास, कस्तुर, शंकर, धोबी, क्रौच असे छोटे मोठे पक्षीही येतात. या सर्वांच्या मागावर असलेले दलदल ससाणा, शिक्रा, कवड्या हरिअर, श्येन, तीसा, कुकरी, खरुची असे शिकारी पक्षीही येतात.