विदर्भात गारठा; अन्यत्र रात्रीच्या गारव्यात वाढ

पुणे / नागपूर : देशाच्या उत्तरेकडून शीत वाऱ्यांचे प्रवाह वाहू लागल्याने विदर्भ गारठला असून उर्वरित महाराष्ट्रात रात्रीचा गारवा पडत आहे. निम्मा डिसेंबर सरल्यानंतर लागलेली थंडीची चाहूल सुखावणारी आहे.    

राज्यात थंडीची प्रतीक्षा संपल्यात जमा आहे. राज्यातील किमान तापमान सरासरीजवळ येऊन रात्रीचा गारवा वाढला आहे. सध्या राज्यात सर्वत्र निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान आहे. त्यातच उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येत असल्याने राज्यातील तापमानात घट झाली आहे. मुंबई, ठाण्यात रात्री गुलाबी थंडी, तर कोकणात गारठा पडला आहे.  संपूर्ण विदर्भ गारठला आहे. थंडीमुळे हुडीहुडी भरली आहे.  

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीमुळे राज्यात डिसेंबरच्या सुरुवातीपासूनच पावसाळी वातावरण होते. बहुतांश भागांत अवकाळी पाऊस झाला. दोन दिवसांपूर्वीपर्यंत काही भागात अंशत: ढगाळ वातावरण होते. त्यामुळे रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या पुढे गेले होते. त्यामुळे थंडी जाणवत नव्हती. सध्या राज्यात सर्वत्र कोरडे हवामान झाले असून, ढगाळ वातावरणही दूर झाल्याने थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली. त्यातच

उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह येत असल्याने दोन दिवसांपासून तापमानात घट सुरू झाली आहे. उत्तरेकडील राज्यात सध्या थंडीची लाट आहे. राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आदी राज्यांत थंडीची लाट तीव्र आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश येथेही थंडीची लाट असून, काही ठिकाणी हिमवृष्टी होत आहे. राजस्थान आणि पंजाबच्या काही भागांत किमान तापमान उणे आहे. राजस्थानातील चुरू येथे रविवारी उणे २.०, तर अमृतसर येथे उणे ०.५ अंश किमान तापमानाची  नोंद झाली. उत्तरेकडील थंडीची ही लाट आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही तापमानातील घट आणखी दोन दिवस राहणार आहे.

किमान तापमानात घट

राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान सरासरीजवळ आले असून, काही भागात ते सरासरीपेक्षा कमी झाल्याने रात्रीची थंडी जाणवत आहे. विदर्भात बहुतांश भागात पारा चांगलाच घसरला आहे. रविवारी जळगाव येथे राज्यातील नीचांकी ११.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या विभागात बहुतांश भागात ११ ते १२ अंशांवर किमान तापमान आहे. कोकण विभागात मुंबईसह सर्वत्र किमान तापमान सरासरीजवळ असून, रत्नागिरीत ते सरासरीखाली आल्याने गारवा वाढला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सोलापूर, महाबळेश्वर, जळगाव आदी भागांतील किमान तापमान ११ ते १२ अंशांपर्यंत आले आहे. मराठवाड्यातही तापमानात घट झाली आहे.

विदर्भ तापमान

गोंदिया जिल्ह्यात विदर्भातील सर्वांत कमी म्हणजे ११.५ अंश से. किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ अमरावती ११.८, बुलढाणा १२.२,  ब्रम्हपुरी १२.८,  वर्धा १२.६, यवतमाळ १३, चंद्रपूर १३.६, नागपूर १३.४, वाशीम १४  अंश से. व अकोला येथे १४,७ अंश से. किमान तापमानाची नोंद झाली.

नागपूरला हुडहुडी

’नागपूरसह संपूर्ण विदर्भही गारठला आहे. विदर्भात रविवारी सर्वांत कमी तापमान गोंदिया जिल्ह्यात (११.५ अंश.से.) नोंदवण्यात आले.

’नागपुरातही पारा १३.४ अंशांपर्यंत खाली आला होता. सकाळच्या बोचऱ्या वाऱ्यांमुळे थंडीची तीव्रता वाढली. रात्री शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

’दिवसाही नागरिक स्वेटर

आणि टोप्या घालून बाहेर पडत आहेत. स्वेटरच्या दुकानांत गर्दी वाढली आहे. थंडीमुळे लहान

मुलांना होणाऱ्या आजारांतही वाढ झाली आहे.

थंडीचा मुक्काम ४८ तास : उत्तरेकडून शीत वारे वाहत असल्याने पुढील ४८ तास राज्यात थंडीचा मुक्काम असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात सर्वांत कमी तापमान (११.३ अंश सेल्सिअस) जळगावात नोंदवण्यात आले.