लोकसत्ता टीम

चंद्रपूर : कॉन्व्हेंट व इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिकेच्या शाळांसोबतच खासगी मराठी माध्यमांच्या शाळांनाही विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. अशाप्रसंगी शिक्षक स्वत:ची नोकरी टिकवण्यासाठी विद्यार्थी शोधमोहिमेवर निघाले आहेत. पालकांना स्कूल बॅग, पुस्तके, गणवेश, बुट तथा विविध प्रकारची आमिषे दाखवून त्यांच्या पाल्यांना शाळांमध्ये प्रवेश दिले जात आहे.

विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांसोबतच कॉन्व्हेंटकडे मोठ्या प्रमाणात आहे. इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटमध्ये चांगले शिक्षण मिळते, असा समज पालकांचा झाला आहे. आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, अशी सर्वच पालकांची इच्छा असते. यासाठी इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश मिळावा म्हणून पालकांची धडपड आणि संघर्ष सुरू असतो. दुसरीकडे, जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिकेच्या शाळांसोबत खासगी मराठी माध्यमांच्या शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. यामुळे शिक्षकांच्या नोकरीवरही गदा आली आहे. तुम्हाला नोकरी टिकवायची असेल तर विद्यार्थी शोधा आणि त्यांना आपल्या शाळांमध्ये प्रवेश घ्यायला लावा, अशी आदेशवजा सूचना या शाळांच्या संचालकांकडून शिक्षकांना दरवर्षी केली जाते. त्यामुळे बहुसंख्य शाळांमधील शिक्षक सकाळी व सायंकाळी शहर व ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये, वार्डावार्डात विद्यार्थी शोधताना दिसून येतात.जिथे चौथ्या वर्गापर्यंत शालेय शिक्षण आहे, तिथे पाचव्या वर्गात प्रवेशासाठी शिक्षक सकाळीच विद्यार्थ्यांचा जन्माचा दाखला व गुणपत्रिका घेण्यासाठी पोहचत आहेत.

आणखी वाचा-जात वैधता प्रमाणपत्राशिवाय सेवेत, जात पडताळणीविना बढती; यवतमाळच्या बाबाजी दाते कला वाणिज्य महाविद्यायातील प्रकार

आमची शाळा उत्तम आहे हे पटवून देतानाच विविध सोयीसवलती तथा पालकांना इतरही अनेक प्रकारची आमिषे दाखवली जात आहेत. विद्यार्थ्यांना शालेय बॅग, पुस्तके, गणवेश, बुट, वॉटरबॅग, कंपास तथा इतरही अनेक प्रकारचे साहित्य मिळेल, असे आश्वासन शिक्षकांकडून पालकांना दिले जात आहे. ग्रामीण भागातून शहरात विद्यार्थी येत असेल तर त्याला बससेवा उपलब्ध करून दिली जात आहे. यासोबतच काही संस्थांनी तर विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याची तयारीही दाखवली आहे. बहुसंख्य संस्था या शिक्षकांकडून एक महिन्याचा पगार स्वत:कडे ठेवून घेतात व त्यानंतर हा पगार विद्यार्थी शोधमोहिमेवर खर्च केला जातो. विद्यार्थ्यांना घरून शाळेपर्यंत आणण्यासाठी ऑटोची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जात आहे.

आणखी वाचा-सावधान! उष्माघाताचे आणखी तीन बळी? नागपूर महापालिका म्हणते…

स्वखर्चातून पाचव्या वर्गात प्रवेश

जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिकेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वर्गातील पटसंख्या व नोकरी टिकवून ठेवायची असेल तर शिक्षकांना विद्यार्थी शोधून आणणे आवश्यक ठरते आहे. काही शिक्षक थेट संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचे जन्मदाखले व गुणपत्रिका मिळवून स्वत:च्या खर्चाने विद्यार्थ्यांना पाचव्या वर्गात प्रवेश देत आहेत. काही इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटच्या शिक्षकांनादेखील विद्यार्थी शोधमोहीम राबवावी लागत आहे. एकूणच सर्व कामे हातावेगळी करून शिक्षक सध्या विद्यार्थ्यांचा शोध घेतानाचे चित्र येथे बघायला मिळत आहे.