वर्धा: वर्षभरापासून आर्वीतील राजकीय मुद्दे गाजत आहे. आता त्यात महामार्गावरील दुभाजकाच्या मुद्द्याची भर पडली असून त्यालाही राजकीय किनार आहेच. मात्र राजकीय तटस्थ म्हणवून घेणाऱ्या जन आक्रोश समितीने हा मुद्दा अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दारी नेला आहे.राष्ट्रीय महामार्ग नागपू्र विभागाचे विभागीय अभियंता बोरकर यांनी सर्वा समक्ष कबुल केल्या प्रमाणे,आर्वी-तळेगाव (शा.पं.) क्र. ३४७ या महामार्गाचे बांधकाम चार फुटच्या व्दिभाजकाची जागा सोडून त्वरीत सुरु करण्यात यावे अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आर्वीकर जन आक्रोष समितीच्या समन्वय समिती सदस्यांनी निवेदन देवुन केली आहे.
निवेदन देणाऱ्यात दशरथ जाधव, बाळाभाऊ नांदुरकर, विनय डोळे, मनोज आगरकर, विजय वाघमारे, पंकज गोडबोले आदिंचा समावेश होता.आर्वी-तळेगाव महामार्गाचे काम गत आठ वर्षा पासुन अडथळ्याची शर्यत पार करीत कासव गतीने सुरू आहे. म्हणता म्हणता १३ किलोमिटरचे बांधकाम कसेबसे पुर्ण झाले आणी अवघ्या दिड किलोमिटरचे काम झाडे वाचवण्याच्या नादात व्दिभाजकाची रुंदी कमी केल्यामुळे व मध्यांकापासुन दोन फुट रस्ता डावी कडे सरकवल्याने अडकले आहे.
यावर तोडगा काढण्याकरीता १८ जुन ला येथील विश्राम गृहात जन आक्रोष समितीचे सदस्य व गणमान्य नागरीकांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग नागपुर विभागाचे विभागीय अभियंता बोरकर, कार्यकारी अभियंता जगताप, उपविभागीय अभियंता इनामदार, कंत्राटदाराचे प्रतिनीधी तथा विधान परिषद सदस्य दादाराव केचे आदि सहभागी होते. यावेळी सर्वासमक्ष अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या जागेची पाहणी केली. झाडांच्या अंतराचे सुध्दा मोजमाप करण्यात आले.
यावेळी विभागीय अभियंता बोरकर यांनी व्दिभाजकाकरीता चार फुटाची जागा सोडण्याची कबुली देवुन सोमवार २४ जुन पासुन काम सुरू करण्याची हमी दिली.सोबतच झाडा संबंधी सुरू असलेल्या खटल्यात सहभागी होण्याची सुचना सुध्दा केली. त्यांच्या सुचने प्रमाणे जन आक्रोष समितीने जनतेची बाजु मांडण्याकरीता ॲड. भोयर यांची नेमणुक सुध्दा केली आहे. याची जाण अधिकाऱ्यांना सुध्दा दिली, मात्र त्यांनी रस्त्याचे बांधकाम काही सुरू केले नाही अशी माहिती यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली.
याशिवाय या महामार्गाने शहर दोन भागात विभागल्या गेले असुन एका बाजुला शाळा, महाविद्यालय,बस स्थानक, बँका, कार्यालय आहे तर दुसऱ्या बाजुला गाववस्ती आहे. याशिवाय पर्यायी सर्व्हिस रस्ता सुध्दा नसल्याने येण्याजाण्यासाठी हाच मार्ग आहे. अशातच २३ तारखे पासुन शाळा कॉलेज सुरू झाल्यामुळे वर्दळ वाढली आहे. दुसऱ्या बाजुचा रस्ता न झाल्यामुळे एकाच लेन वरुन वाहतूक होत असल्याने दररोज लहानलहान अपघात सुध्दा घडत आहे. मोठा अपघात होवुन जिवीत हानी सुध्दा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणुन दिले.
आमदार सुमित वानखेडे यांनी आपण लोकांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट करीत संभाव्य धोके टाळून काम व्हावे, अशी भूमिका घेतली आहे. तर आमदार दादाराव केचे यांनी ठरलेल्या अंतराचेच दुभाजक होण्याची उघड भूमिका घेतली. नितीन गडकरी यांना भेटून आलेले आक्रोश समितीचे दशरथ जाधव म्हणतात की आमची बाजू गडकरी यांनी ऐकून घेतली. तसेच ही भूमिका सहाय्यक अधिकाऱ्यांना समजावून सांगण्यास सांगितले. दोन्ही आमदारांनी आता खात्यावर हा निर्णय सोपविल्याचे दिसून येते. मात्र रस्ता बांधकाम कबूल केल्याप्रमाणे झालेच पाहिजे.