वर्धा : एकमुखाने निर्णय होत असल्याचा दावा भाजपतर्फे नेहमी केल्या जात असतो. वरिष्ठ नेत्यांचा आदेश अंतिम, अशी सोज्वळ भावना व्यक्त केल्या जाते. हे मात्र वरकरणीच, स्पर्धा तर असतेच असेही याच पक्षातील नेते सांगत असतात. आता जिल्हाध्यक्षपद चर्चेत आहे. मंगळवारी मुंबईत संपन्न बैठकीत निरीक्षक अरुणसिंग व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. त्यात जिल्हाध्यक्ष कसा असावा याचे निकष सांगितले.
मात्र याच बैठकीनंतर लगेच विविध गट सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. एक राज्यमंत्री, चार आमदार, दोन माजी खासदार अशी जिल्हा भाजपात दमदार आब राखून असलेली फळी आहे. त्यामुळे स्पर्धा अटळ. जिल्हा भाजपात आजवर प्रामुख्याने तेली – कुणबी असे जातीगत वर्चस्व राहले. त्याचा समतोल राखता राखता वरिष्ठ नेहमी पेचात पडतात. पण अन्य समाज पण सामावून घेतले पाहिजे असा सूर सूरू झाला आहे. नेहमी कुते म्हणजे कुणबी – तेलीच कां, असा गमतीदार सवाल एका नेत्याने मांडला. म्हणून या दोन जातीखेरीज आलेल्या अन्य नावात संघाच्या मुशीत घडलेले पुलगाव येथील संजय गाते यांचे नाव घेतल्या जात आहे. ते प्रदेश भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष राहून चुकले. तसेच संघटन कार्यात त्यांचे योगदान आठवून दिल्या जाते. विद्यमान प्रदेश सचिव व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सरिता गाखरे यांचेही नाव पुढे आले आहे. आर्वीतील पक्षाच्या दोन आमदारापैकी गाखरे यांच्या पाठीशी कोण, हे गुलदस्त्यात आहे. पक्षाचे सर्वात अधिक काळ महासचिवपद भूषविणारे अविनाश देव हे पण रांगेत आहेच. ते म्हणतात निकष पाहू जाता या पदासाठी सर्वाधिक पात्र मीच आहे. पण मी स्वतः कोणास गळ घालणार नाही की ईच्छा बोलून पण दाखविणार नाही.
मी ईच्छुक आहे व प्रयत्न पण करणार, असा खुला दावा माजी जि. प. सभापती मिलिंद भेंडे करतात. २००९ पासून पक्ष कार्य करीत असून बेशिस्तीचा कोणताही ठपका आपल्यावर नाही, असे सांगत भेंडे यांनी अध्यक्ष म्हणून मला संधी मिळाली पाहिजे, अशी भावना मांडली. माजी नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्याकडे रेस का घोडा म्हणून पाहल्या जाते. अध्यक्ष असतांना त्यांनी नागपूरस्थित एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांस केलेली मदत हे त्यांचे असेट म्हटल्या जाते. विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनील गफाट म्हणतात की परत संधी पक्षाने दिल्यास ती अवश्य स्वीकारू.
अपवाद वगळता यापैकी प्रत्येकावर विशिष्ट नेत्याचा आशीर्वाद असल्याचे लपून नाही. मात्र संमतीने व्हायला आवडेल, असे हे ईच्छुक म्हणतात. पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर म्हणाले की मी कोणत्याच नावाचा आग्रह धरलेला नाही. एकत्रित बसून जे नाव मान्य होईल, त्यास मी समर्थन करणार. आमदार सुमित वानखेडे म्हणाले की असा विशिष्ट नावाचा आग्रह चालत नसतो. मी कोणतेही नाव पुरुस्कृत केले नाही. आम्ही सर्व मिळवून ठरवू. तर माजी खासदार रामदास तडस यांनी सर्वसमावेशक असे नाव निवडल्या जाण्याची शक्यता मांडली.
काय आहेत निकष ?
मुंबईत काल मंगळवारी झालेल्या बैठकीत काही निकष नमूद करण्यात आले. सक्रिय सदस्य असणे आवश्यक,संघटनेत काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक, वयोमर्यादा ६० वर्ष खालील, वर्तमान मध्ये काही पदे अनुभवलेला,आमदार खासदार यांना अध्यक्ष पदाकारिता उभे राहता येणार नाही, महिला, एससी व एसटी यांना प्राधान्य द्यावे, ज्यांनी लोकसभा व विधानसभेला विरोधात काम केले त्यांना विचारात घेऊ नये. अध्यक्ष निवडणूक ३० एप्रिल पर्यंत समाप्त करावी. जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री मदन येरावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.