वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाने आज एक अतिशय भावोत्कट प्रसंग अनुभवला. सनदी अधिकारी सहसा भावनेच्या आहारी जात नसल्याचे म्हटल्या जाते. विचारपूर्वक व शांत डोक्याने ते व्यक्त होतात आणि निर्णय घेतात. सार्वजनिक ठिकाणी तर ते भावभावनांना कोसो दूर ठेवतात असे म्हटल्या जाते. पण अधिकारी म्हटला तरी तो मनुष्यच. प्रसंगी भावनावेग येतोच. आणि तो बाहेर पण पडतो. आज तसेच झाले. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या डोळ्यात पाणी तरळले. मिनिटभर मौन राहल्या. आवंढा गिळला आणि माईक सोडून आपल्या जागेवर जाऊन बसल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्ववार नियुक्तीपत्र देण्याचा शासकीय कार्यक्रम होता. पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर, पोलीस अधीक्षक अनुराग जैन व अन्य मान्यवर उपस्थित होते. नायब तहसीलदार अतुल रासपायले हे प्रस्ताविक करतांना आपला अनुभव सांगून गेले. ते म्हणाले की माझे वडील १९९१ मध्ये मरण पावले. पण त्यांच्या जागेवर नियुक्ती मिळण्यासाठी मला खूप त्रास झाला. सतत शासनाकडे चकरा माराव्या लागल्या. अखेर सात वर्षानंतर १९९८ मध्ये मला शासकीय नौकरी मिळाली. पण अनुकंपा धोरण खूपच सोपे करण्यात आले आहे. हे नवे धोरण पटकन म्हणजे २०२३ मध्ये जर मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबात आज नौकरी पोहचली आहे. रासपायले यांची ही भावना उपस्थितांना चटका लावणारी ठरली.
यानंतर जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी बोलायला सुरवात केली. रासपायले यांच्या भाषणातील धागा मांडत त्या म्हणाल्या वडील गेल्यावर त्या घराचे काय हाल होतात, हे मी अनुभवले आहे. आज परत त्यांची,,,,, एवढेच बोलत असतांना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. वडिलांच्या आठवणीत त्या भावविवश झाल्यात. आवंढा गिळला. पुढे त्या बोलूच शकल्या नाहीत. लगेच त्यांनी माईक सोडून आपले स्थान ग्रहण केले. मात्र त्यांची ही भावना सभागृहास स्तब्ध करून गेली. दोन मिनिटे शांतता पसरली. निवेदनकर्ता पण मौन उभा राहला होता. जिल्हाधिकारी यांनी अत्यंत खडतर वाटचाल करीत सनदी सेवा गाठली, हे येथील सर्वांना परिचित आहे. त्यामुळे त्यांचे डोळ्यातील अश्रू स्तिमीत करणारे ठरले.
यानंतर पालकमंत्री डॉ. भोयर यांनी पण धोरण बदलले आणि अनेकांना लवकर शासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना व्यक्त केली. हजारो कुटुंबाना न्याय मिळाला. कुटुंबातील कर्ता अचानक गेल्याने त्या कुटुंबात संकटाचा पहाड कोसळतो. त्या कुटुंबाचे दुःख कमी कर्ता यावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकंपा धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाने नौकर भरतीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविणे सूरू केल्याचे डॉ. भोयर म्हणाले.