गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती असून शेकडो गावे संकटाच्या सावटात आहे. १०० टक्के भरलेल्या दहा मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या ७५ दारांतून तसेच २० छोट्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. ही भीषण स्थिती लक्षात घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या १२ ऑगस्टला वर्धा तालुक्याच्या विशेष पाहणीसाठी येणार आहेत.

सततच्या मुसळधार पावसाने सर्व धरणं तुडुंब भरली आहेत.त्यामुळे धोका टाळण्यासाठी पाणी सोडण्याचा एकमेव पर्याय उपलब्ध असल्याचे पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ सांगतात.

अभूतपूर्व असे संकट जिल्ह्यातील बारा नदीकाठच्या २२४ गावांवर कोसळले आहे. त्यापैकी ९६ गावे अतिजोखमीची असल्याने त्यावर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी धाम, पोथरा, पंचधारा, डोंगरगाव, मदन, उन्नई, लाल नाला, कार व सुकळी १०० टक्के भरले असून उर्वरित अंशी टक्के भरलेल्या प्रकल्पातूनही विसर्ग सुरू आहे. हराशी, अंबाझरी, उमरी, मलकापूर, दहेगाव व अन्य एकूण वीस प्रकल्पातून पाणी वाहू लागले आहे. या विसर्गाचे नियोजन साधून अधिकाधिक गावांना पुरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकारी सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे शुक्रवारी आगमन पक्के असून पुराच्या अनुषंगाने मदत देण्याबाबत भूमिका मांडणार असल्याचे आमदार डॉ. पंकज भोयर म्हणाले.