वर्धा : पालिका निवडणुकीत पण आघाडीतील विसंवाद कायम असल्याचे चित्र पुढे आले आहे. लोकसभा निवडणुकीत प्रथमच पंजा चिन्ह गायब झाले होते. नंतर विधानसभा निवडणुकीत चार पैकी दोन जागा काँग्रेस वाट्याला आल्या. आता वर्धा, आर्वी व हिंगणघाट पालिकेत बहुसंख्य प्रभागात काँग्रेसची गैरहजेरी दिसून येत आहे. यांस काँग्रेस नेतेच जबाबदार असल्याचा आरोप सूरू झाला आहे. तर मित्र पक्ष राष्ट्रवादीचे नेते पण शेवटच्या क्षणापर्यंत ताटकळत ठेवून गोंधळ निर्माण केल्याचा ठपका काँग्रेस नेत्यांवर ठेवू लागले आहे.

आजच्या स्थितीत वर्धा पालिकेत ४० पैकी १९ जागा काँग्रेसमुक्त झाल्या आहेत. आर्वीत उमेदवार काँग्रेसचे पण चिन्ह तुतारी. हा गोंधळ अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत चालण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बोलचाल करणारे कर्ते कोण, याचाच गोंधळ चालला. जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले व खासदार अमर काळे हेच आघाडीची बोलणी करतील असे काँग्रेस नेत्यांनी गृहीत धरले होते. मात्र इकडे वेगळा खेळाडू राखीव पत्ता ठेवून आहे हे काँग्रेस नेते मानायलाच तयार नव्हते. राष्ट्रवादीच्या प्रदेश नेत्यांनी सहकार नेते व माजी आमदार सुरेश देशमुख यांना वर्धा व देवळी मतदारसंघातील पालिकांची जबाबदारी दिली. पण खोटेच, असे काँग्रेस गृहीत धरून चालली.

सुरेश देशमुख यांच्यातर्फे समीर देशमुख यांनी सूत्रे स्वीकारून शेखर शेंडे यांच्या दारी आघाडी बोलणी केली. पण या दोघांचे जागावाटप काँग्रेस नेत्यांना अमान्य होते. वर्धा पालिकेत शेखर शेंडे व राष्ट्रवादीचे देशमुख यांच्या जागा वाटपाचे सूत्र अमान्य झाले आणि काम बाचाबाची पर्यंत येऊन ठेपले. समीर नव्हे तर जिल्हाध्यक्ष वांदिले यांच्याशीच बोलू, असे काँग्रेसकडून झाले आणि समीर देशमुख हर्ट झाल्याचे काँग्रेसीचा एक गट सांगतो.

शेवटच्या क्षणापर्यंत निरोप नं आल्याने समीर देशमुख यांनी त्यांच्याकडे असलेले एबी फार्म आपल्या समर्थक उमेदवारांना देणे सूरू केले. एव्हाना आघाडीची वाट लागण्याची बाब वेग पकडू लागली. शेखर शेंडे यांनी आपले ऐकाचेच नसेल तर आपण यातून बाहेर पडतो, असे स्पष्ट करून टाकले. तसा संदेश प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठवून दिला. वेळ गेली नाही, लवकर हस्तक्षेप करावा, या संदेशाचे उत्तरंच आले नाही आणि सर्व ठप्प पडले. काँग्रेसतर्फे माजी आमदार रणजित कांबळे हेच सर्व निर्णय घेणार असतील, माझ्या वर्धा मतदारसंघात पण ते मनमानी करणार असतील तर मी जबाबदारी घेऊ कसा, असा त्यांचा सवाल राहला. आता नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित पण त्यास घेऊन चालण्याची जबाबदारी असणारे प्रभागातील उमेदवार गायब, असे चित्र आहे.

जिल्हा काँग्रेस प्रभारी राजेंद्र मुळक म्हणतात की मी प्रत्येक बाबीत लक्ष देवू शकत नाही. काँग्रेसची जबाबदारी रणजित कांबळे व शेखर शेंडे यांच्याकडे दिली होती. त्यांनी जागा वाटप सूत्र ठेवून त्याचा अहवाल मला सादर करणे अपेक्षित. त्यानुसार राष्ट्रवादीस जागा सोडल्या. आम्ही एक पण एबी फॉर्म त्यांच्या वॉर्डात दिलेला नाही. आघाडीत कुरबुरी असतातच. पण त्या दूर होतील. काल रात्री राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याशी बोलणी झाली आहे. अर्ज परत घेण्याच्या मुदतीत सर्व काही सुरळीत होईल, असे मुळक यांनी स्पष्ट केले.