वर्धा : जुना व्हिडीओ प्रसारित केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या ‘एक्स’ खात्याच्या अॅडमीनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. आदर्श आचारसंहिता लागू असताना हा खोडसाळ प्रकार केल्याचा त्यांचा आक्षेप आहे.
काँग्रेसच्या एक्स खात्यावर रामदास तडस व भाजपसंदर्भात अतिशय खोडसाळ पण बनावटी व बदनामीकारक अर्धवट व्हिडीओ प्रसारित करण्यात आला आहे. हा व्हिडीओ जवळपास पाच वर्षांपूर्वी म्हणजे ३ एप्रिल २०१९ ला त्यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची दिशाभूल करण्यासाठी प्रसारित करण्यात आला होता, असे तक्रारीत नमूद आहे. आता परत तो प्रसारित करण्यात आला, अशी तक्रार रामनगर पोलिसांकडे करण्यात आली. त्याची दखल घेवून पोलिसांनी आज भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.
हेही वाचा – शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार
पाच वर्ष जुना असलेला व्हिडीओ व आता भाजपने निवडणुकीदरम्यान केलेली घोषणा या दोन्ही गोष्टीचा वास्तविकतेशी काहीच संबंध नाही. जुनाच व्हिडीओ बनावट पद्धतीने सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याची बाब चुकीची व बेकायदेशीर आहे. जनतेस खोटी माहिती देणे व लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलीन करण्याची बाब संवेदनशील ठरते. काही व्यक्ती हेतूपुरस्सर हे कृत्य करीत आहे. त्यामुळे याची चौकशी होणे आवश्यक आहे, असे तडस यांनी नमूद केले.