वर्धा : सावंगी येथील दत्ता मेघे अभिमत आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा गणेशोत्सव हा पंचक्रोशीत प्रसिद्ध. विविध उपक्रम, विदर्भस्तरीय गायन स्पर्धा, विद्यार्थी जल्लोष, देशभरातील त्यांच्या पालकांची उपस्थिती व सर्वात शेवटी म्हणजे या राजाचा विसर्जन सोहळा. रविवारी रात्री हा विसर्जन सोहळा संपन्न झाला. वर्धा शहर व लगतच्या गावातून हजारोच्या संख्येत येथे गर्दी उसळते. हा नजारा पाहण्याची सर्वांनाच ओढ लागून राहली असते. रविवारी सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले.

या सावंगीच्या राजाची ‘सिंदूर गणेश ‘ म्हणून प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. मूर्तिकार असलेले संस्थेचे कर्मचारी रवी येणकर यांनी ही आकर्षक मूर्ती साकारली. स्थापनानंतर दहा दिवस रेलचेल उपक्रम झालेत. गावात सर्व मुर्त्यांचे अनंत चतुर्दशीस विसर्जन झाल्यानंतर सावंगीच्या राजास निरोप दिल्या जातो. कारण विसर्जन मिरवणुकीस लाभणारा प्रतिसाद. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची विनंती मान्य करीत विसर्जन सोहळा सुरु झाला. सायंकाळी महाआरती झाली आणि गुलालाची उधळण, फाटक्यांची आतषबाजी, रुद्रनाद कलापथकाचा ढोल ताशा, चाळीसगावचा बँड आणि नृत्यात थिरकणारी तरुणाई. या वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी या उत्सवाच्या विविध उपक्रमात आवर्जून सहभागी असतात. त्यांचे पालक पण स्नेह संमेलनप्रमाणे साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवसाठी येत असतात.

सायंकाळी प्रकाशदिव्यांच्या छत्रचामरात मिरवणुकीस आरंभ झाला. लख्ख रोषणाईत शहर उजळून काढत वाजतगाजत निघालेल्या या मिरवणुकीच्या दुतर्फ एकच गर्दी उसळली होती. सुरुवातीस जीपवर पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे, माजी पालिका उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर गणेशभक्तांना अभिवादन करीत होते. तर कुलपती व या मिरवणुकीचे प्रेरक दत्ता मेघे आपल्या गाडीत बसून लोकांचा नमस्कार स्वीकारीत होते.

आपले राजकीय यश ही सावंगीच्या ‘ राजाची ‘ कृपा अशी भावना ठेवणारे पालकमंत्री डॉ. भोयर सर्व औपचारिकता सोडून आनंद व्यक्त करीत होते. तर दुसरीकडे विश्वस्त सागर मेघे, संचालक डॉ. राजीव बोरले, विशेष अधिकारी संजय इंगळे तिगावकर यांची देखरेख होतीच. पण मिरवणुकीस रंगत आणतात ते भावी डॉक्टरच. झाडून सर्व वैद्यकीय शाखांची मुलं, मुली ढोल ताशाच्या नादावर नृत्याचे फेर धरतात, तेव्हा लोकही नाचायला सुरुवात करीत असल्याचे दृष्य. रात्री उशीरा पवनारच्या धाम नदीवर विसर्जन अखेर सुरू होते तेव्हा बाप्पाचा होणारा गजर आसमंत निनादून सोडतो. आणि भक्तांचा सावंगीस परतीचा प्रवास सुरू होतो.