अकोला : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगर पालिका व नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू होणार असली तरी युती-आघाडीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड स्पर्धा असून रस्सीखेच सुरू झाली आहे. वाशीम जिल्ह्यात चार नगर पालिका व एका नगर पंचायतीसाठी निवडणूक होईल. या स्थानिक निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी पक्ष नेतृत्वाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
राज्यात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. नगर पालिका व नगर पंचायतीच्या परिसरात राजकीय रणधुमाळी सुरू झाली. वाशीम जिल्ह्यातील नगर पालिका व नगर पंचायतींचा कार्यकाळ संपून बराच करावधी झाला. अनेक वर्षांच्या प्रशासक‘राज’ नंतर आता सभागृह अस्तित्वात येईल. या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने त्यापदासाठी प्रचंड चुरस आहे. आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली. सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची गर्दी आहे.
त्यापार्श्वभूमीवर उमेदवारी वाटपानंतर सर्वच पक्षांमध्ये नाराजीनाट्य रंगण्याची चिन्हे आहेत. वाशीम जिल्ह्यातील वाशीम, कारंजा, रिसोड आणि मंगरुळपीर नगर पालिकांची, तर मालेगाव नगर पंचायतीसाठी निवडणूक होत आहे. प्रामुख्याने नगराध्यक्ष पदावर सर्वांचे लक्ष राहील. महायुती व महाविकास आघाडी अस्तित्वास आल्यास नगराध्यक्ष पदासंदर्भात पक्षांना वाटाघाटी करावी लागेल. प्रत्येक पक्षाचा नगराध्यक्ष पदावर डोळा असल्याने बोलणे कितपत यशस्वी होते यावर साशंकता आहे. ही स्थानिक निवडणूक कार्यकर्त्यांची म्हणून ओळखली जाते. कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याची कसरत नेत्यांना करावी लागणार असून त्यांचे अस्तित्व देखील पणाला लागणार आहे.
मतदारांवर परिणाम होणारे कार्यक्रम घेण्यावर बंदी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर पालिक व नगर पंचायतींच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता ही संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संपूर्ण क्षेत्रासाठी लागू राहील, तसेच पोटनिवडणुकीच्या बाबतीत ती फक्त संबंधित प्रभाग, निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणापुरती लागू आहे. निवडणूक होणाऱ्या संस्थेच्या क्षेत्रापुरतीच आचारसंहिता लागू असली तरी त्या बाहेरील परिसरात आयोजित कार्यक्रमांमुळे मतदारांवर परिणाम होणार असल्यास असे कार्यक्रम आयोजित करता येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी कुंभेजकर यांनी दिले आहेत.
