लोकसत्ता टीम

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीने शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्यापही पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणाच केली नसल्याचा दावा, भावना गवळी समर्थकांकडून केला जात आहे.

त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही भावना गवळी यांना उमेदवारी मिळावी म्हणून खिंड लढू, अशी प्रतिक्रिया भावना गवळी समर्थक शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख उमाकांत पापीनवार यांनी बुधवारी रात्री उशिरा दत्त चौकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गवळी समर्थकांनी जोरदार निदर्शने करून, भावना गवळींची उमेदवारी कापण्यामागे पक्षातीलच काही नेत्यांचा हात आहे, असा थेट आरोप केला. भाजपला गवळींच्या उमेदवारीबाबत कोणताही आक्षेप नव्हता, असा दावाही गवळींचे समर्थक नितीन बांगर यांनी केला. भाजपने गवळींच्या उमेदवारीस सर्वेक्षण अहवालाचा आधार घेतला असेल, तर राजश्री पाटील यांना कोणत्या सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवारी घोषित केली, असा प्रश्नही बांगर यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा-भावना गवळींना उमेदवारी नाकारली; पण, स्वत: मुख्यमंत्री यवतमाळात येत असल्याने शेवटच्या क्षणी…

हिंगोलीत हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी भापजने मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकून रद्द करण्यास भाग पाडले असताना, यवतमाळ-वाशिममध्ये भाजप हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना कोणत्या आधारावर मदत करतील, असा प्रश्नही गवळी समर्थकांनी उपस्थित केला आहे. भावना गवळी या पाचवेळा खासदार राहिल्या आहेत. त्या अपराजित खासदार असून दरवेळी त्यांच्या मताधिक्यात किमान १० टक्यांटीची वाढ झाली, याकडे त्यांची उमेदवारी नाकारताना सपशेल दुलर्क्ष का करण्यात आले, असाही प्रश्न पापीनवार, बांगर यांनी उपस्थित केला.

‘इलेक्टिव मेरिट’च्या आधारावर भावना गवळींना उमेदवारी नाकारली तर राजश्री पाटील यांच्याकडे कोणते कोणते इलेक्टिव मेरिट आहे, असा सवाल उपस्थित करून राजश्री पाटील यांनी यापूर्वी लढविलेल्या निवडणुकीत त्यांची कशी दुर्दशा झाली, याची जंत्रीच गवळी समर्थकांनी पत्रकारांना दिली. राजश्री हेमंत पाटील या नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीत वाडी जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार असताना पराभूत झाल्या, याकडे लक्ष वेधले.

आणखी वाचा-अकोला : कोट्यवधींची मालमत्ता अन डोक्यावर कोट्यवधींचे कर्ज; काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्याकडे…

२०१९ मध्ये नांदेड दक्षीण विधानसभा मतदार संघामधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार असताना अपक्ष उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. तर राजश्री हेमंत पाटील या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या जावून त्यांची निवडणूक अमानतही जप्त झाली होती, असे बांगर म्हणाले.

हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे निष्क्रीय खासदार असल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनीच केला आहे. त्यांच्या पल्नी राजश्री पाटील या जिल्हा परिषद व विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या असताना त्या यवतमाळ-वाशिममध्ये निवडणूक जिंकतील, हे कशाच्या आधारावर महायुतीने ठरविले, हा प्रश्न गवळी समर्थकांनी उपस्थित केला आहे. खा. भावना गवळी या सलग पाच वेळी विजयी होत अपराजीत खासदार राहिल्या आहेत. वाढत्या मताधिक्याने निवडणूक जिंकत असतानाही केवळ पक्षातील स्थानिक नेत्यांची मर्जी सांभाळण्याठी त्यांचे तिकीट कापले, असा आरोप केला. भावना गवळी समर्थकांनी महायुतीचा कोणता उमेदवार अखेरच्या क्षणी नामांकन अर्ज दाखल करतो, याची प्रतीक्षा करू आणि नंतर रोखठोक भूमिका घेवू, असे स्पष्ट केले.