लाल महालमधील छत्रपतींच्या गनिमी काव्याच्या धर्तीवर पोलिसांचा चक्रव्यूह शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज दुपारी गनिमी काव्याने भेदला! खाकी वर्दी परिधान करून त्यांनी अंगावर डिझेल ओतून घेतले. परंतु, पोलिसांनी त्यांना आत्मदहन करण्याची संधी दिली नाही. सध्या भिजलेल्या अवस्थेत व शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांच्या गराड्यात तुपकर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडून बसले असून, रस्त्यावरच त्यांची शासन व प्रशासन यांच्यासमवेत वाटाघाटी सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिकविम्याची रक्कम मिळावी, नैसर्गिक आपत्तीची नुकसानभरपाई द्यावी, सोयाबिन व कपाशीला दरवाढ मिळावी आदी मागण्यासाठी तुपकर यांनी आज मुंबईत वा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आत्मदहन करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून भूमिगत झालेले रविकांत तुपकर आज सात दिवसांनंतर थेट जिल्हा कचेरी परिसरात प्रगटले. कचेरीकडे येणारे पाचही मार्ग बंद, परिसरात दोनशे पोलीस अधिकारी व त्यांचा गराडा, असा तगडा बंदोबस्त होता. तो भेदून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

असा दिला पोलिसांना गुंगारा

चोख बंदोबस्त व ठिकठिकाणी होणारी तपासणी चुकवून तुपकरांनी जिल्हा कचेरी गाठलीच. हजारांवर शेतकरी व कार्यकर्त्यांचा मोर्चा चिखली मार्गावरून निघाला. यात तुपकर असतील हा अंदाज चुकला. मोर्चा तहसील जवळून कोषागार कार्यालय जवळ पोहोचला. यावेळी पळत सुटणाऱ्या कार्यकर्त्यांत आशीर्वाद रुग्णालयमार्गे वेषांतर करून आलेले तुपकर बेमालूमपणे मिसळले. स्टेट बँक जवळ येईपर्यंत त्यांनी हातातील पाण्याच्या बाटलीमधील डिझेल अंगावर ओतून घेतले. पुढे जाणाऱ्या तुपकरांनी मग जिल्हा कचेरी समोर ठिय्या मांडला. यावेळी तुपकरांसह कार्यकर्ते व पोलिसांनी संयम दाखविल्याने संभाव्य संघर्ष टळला. या गदारोळात जिल्हा कृषी अधीक्षक चंद्रकांत डाबरे यांनी विमा कंपनी व शासनातर्फे देण्यात आलेल्या मदतीची जाहीर माहिती देऊन चर्चा केली. दरम्यान, मंगण्यासंदर्भात ठोस निर्णय होईस्तोवर येथून हटणार नाही, असा इशारा तुपकर यांनी दिला.

पोलिसांकडून शेतकरी व कार्यकर्त्यांवर लाठीमार

तुपकर यांचे जिल्हा कचेरीसमोरील आंदोलन अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून उधळून लावले. यावेळी करण्यात आलेल्या लाठीमारात अनेक शेतकरी व कार्यकर्ते जखमी झाले. तुपकर व त्यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांच्यासह मुख्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना स्थानबद्ध करून बुलढाणा पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wearing khaki uniform ravindra tupkar penetrated the police arrangement in buldana scm 61 ssb
First published on: 11-02-2023 at 17:00 IST