नागपूर: विविध हिंदुत्ववादी संघटनांबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी लव्ह जिहादविरोधी कायद्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. याबाबत लवकरच कायदा करण्याबाबत निर्णय होईल, असे आश्वासन त्यांनी दिले, असे शिवसेनाच्या शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोगावले म्हणाले, मुख्यमंत्रीबरोबर झालेल्या बैठकीत हिंदू जनजागृती समिती, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू विधिज्ञ परिषद, सनातन संस्था, संकल्प हिंदू राष्ट्र अभियान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, राष्ट्रीय युवा गठबंधन, सर्वभाषिक बाह्मण महासंघ, चित्पावन ब्राह्मण महासंघ आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. बैठकीला ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री संजय राठोड, शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. बैठकीमध्ये लव्ह जिहाद तसेच मंदिरांना मदतीच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यात आले. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे. कायद्यासंदर्भात राज्य सरकारने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. लवकरच या संदर्भात तुम्हाला निर्णय समजेल.

हेही वाचा – रूफ टॉप हॉटेलवर बंदी येणार? राज्य शासन धोरणात्मक निर्णय…..

हेही वाचा – अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी सुट्टी जाहीर करा, शिंदे गटाची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कायदा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातही लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. राज्यात लव्ह जिहादच्या विरोधात पन्नासहून अधिक मोर्चे निघाले. परंतु एक वर्ष उलटून गेल्यावरही कायदा झाला नाही. तर, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांनी लव्ह जिहादच्या विरोधात कायदा केला आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी बैठकीत दिल्याचेही यावेळी सांगण्यात आले.