नागपूर : रेल्वे रुळ, सिग्निल यंत्रणा, वीज तारा आदींची देखभाल दुरुस्तीसाठी दररोज मिळणारा वेळ अत्यंत मर्यादित असतो, कारण शेवटची गाडी आणि पहिल्या गाडीमधील कालावधी फक्त काही तासांचा असतो. यामध्येही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे उशिराने चालणे, तांत्रिक बिघाड, मार्गामधील अन्य अडथळे, पावसाळ्यातील अतिपर्जन्य यामुळे येणाऱ्या अडचणी यामुळे वेळेचा उपयोग नीट करता येत नाही. त्यामुळे या कामांसाठी दर आठवड्याला एक विशिष्ट वेळ निश्चित करून देखभाल दुरुस्तीचे नियोजन केले जाते.

रेल्वे सेवा चालवताना पायाभूत सुविधांवर मोठा ताण येतो, त्यामुळे विविध उपकरणे झिजतात आणि त्यांची झीज वेळोवेळी भरून काढावी लागते. यामध्ये रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड उपकरणे, विजेच्या तारा व जोडणी साहित्य, ट्रॅकची जोडणी इ. बाबींचा समावेश होतो. रेल्वेची कार्यक्षमता व सुरळीत सेवा सुनिश्चित करण्यासाठी या सर्व यंत्रणांची नियमित देखभाल करणे आवश्यक असते.

दररोज देखभालीसाठी मिळणारा वेळ अत्यंत मर्यादित असतो, कारण शेवटच्या गाडी आणि पहिल्या गाडीमधील कालावधी फक्त काही तासांचा असतो. यामध्येही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे उशिराने चालणे, तांत्रिक बिघाड, मार्गामधील अन्य अडथळे, पावसाळ्यातील अति पर्जन्य यामुळे येणाऱ्या अडचणी यामुळे वेळेचा उपयोग नीट करता येत नाही.

रात्रीच्या वेळेस काम करताना देखील काही मर्यादा असतात – कमी प्रकाश, कामाचे अपारदर्शक वातावरण, यामुळे कामाच्या परिणामातही घट होते. याशिवाय काही विशिष्ट तापमानावर कराव्या लागणाऱ्या कामांसारखी कामे रात्री कमी तापमानामुळे करता येत नाहीत. म्हणूनच दर आठवड्याला एक विशिष्ट वेळ निश्चित करून देखभाल दुरुस्तीचे नियोजन करणे आवश्यक ठरते आणि यालाच ‘मेगा ब्लॉक’ असे म्हणतात.

‘मेगा ब्लॉक’ म्हणजे पायाभूत सुविधांसाठी मिळणारी एक प्रकारची विश्रांती असते. साधारणतः मेगा ब्लॉक रविवारी घेतला जातो, कारण त्या दिवशी प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असते. तसेच, आठवड्याच्या इतर दिवशी गाड्या रद्द करणे किंवा वेळापत्रकात बदल करण्यामुळे अनेक प्रवाशांना अडचणीचे ठरु शकते. मेगा ब्लॉकचं नियोजन कसं केले जाते?

मेगा ब्लॉकचे नियोजन सर्वप्रथम अशा महत्त्वपूर्ण देखभाल किंवा बदलाच्या कामांपासून सुरू होतं, जी कामं ट्रॅक पूर्णपणे बंद केल्याशिवाय करता येत नाहीत आणि जी गाड्या सुरू असताना शक्यच नसतात. मालमत्तेच्या स्थितीचे निरीक्षण, बिघाडांचे विश्लेषण आणि प्रकल्पांच्या वेळापत्रकाच्या आधारे कामांची प्राधान्यक्रमानुसार यादी तयार केली जाते. यानंतर अभियांत्रिकी, सिग्नल व दूरसंचार, विद्युत आणि इतर संबंधित विभागांशी संयुक्त समन्वय व नियोजन बैठक घेतली जाते.