अमरावती : जॉर्जियामधील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषकात विदर्भाच्या दिव्या देशमुखने विजेतेपदावर नाव कोरले. विशेष म्हणजे, तिने आपल्याच देशाच्या कोनेरू हम्पी हिचा पराभव केला. दिव्याच्या या यशाबद्दल तिच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अमरावतीकरांनीही तिच्या यशाचा आनंद व्यक्त केला आहे.
दिव्या देशमुख हिचा जन्म नागपूर येथे झाला असला, तरी तिचे अमरावतीशी विशेष नाते आहे. अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू दिवंगत डॉ. के.जी. देशमुख यांची ती नात आहे. त्यांचे मूळगाव हे अमरावती जिल्ह्यातील धामणगाव (काटपूर) असून दिव्या हिचे वडील नागपूर येथे स्थायिक झाले आहेत, अशी माहिती येथील उद्योजक नितीन मोहोड यांनी दिली. नितीन मोहोड यांनी दिव्या देशमुख हिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे. या तिच्या प्रतिभेने विदर्भाचे नाव उंचावले आहे, असे मोहोड म्हणाले.
तत्कालीन नागपूर विद्यापीठाचे विभाजन करून १ मे १९८३ रोजी अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. डॉ. के.जी. देशमुख यांनी पहिले कुलगुरू म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठात अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय सुधारणा करण्यात आल्या. त्यांनी शिक्षण क्षेत्रात नवोपक्रमांना चालना दिली आणि विद्यार्थ्यांसाठी चांगल्या संधी निर्माण करण्यासाठी काम केले. कुलगुरूपदाच्या कारकिर्दीव्यतिरिक्त, डॉ. देशमुख हे एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ते देखील होते. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ देखील होते आणि विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे विचार मांडले, अशी आठवण नितीन मोहोड यांनी सांगितली.
दिव्या देशमुख हिचा जन्म नागपूरचा आहे. तिचे वडील जितेंद्र आणि आई नम्रता हे दोघेही डॉक्टर आहेत. ती भवन्स सिव्हल लाईन्स शाळेची विद्यार्थिनी असून लहानपणापासूनच ती बुद्धिबळ खेळण्यात पारंगत आहे.
जॉर्जियामधील बाटुमी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताच्या कोनेरू हंपीने विजय मिळवला होता. त्यामुळे, या अंतिम लढतीत दोन्ही खेळाडू भारताच्याच होत्या.
उपांत्य लढतीतल्या दुसऱ्या फेरीत दिव्याने चीनची माजी वर्ल्ड चॅम्पियन झोंगयी टॅन हिला हरवत फायनलमध्ये प्रवेश केला होता. दिव्या आता २०२६ मध्ये होणाऱ्या महिला कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे तसेच तिने आपला पहिला ग्रँडमास्टर नॉर्मही मिळवला आहे.
दिव्याला २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय मास्टर, २०२१ मध्ये महिला ग्रँडमास्टर, २०१८ मध्ये महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आणि २०१३ मध्ये महिला फिडे म्हणजेच ‘इंटरनॅशनल चेस फेडरेशन’कडून दिली जाणारी मास्टर पदवी मिळाली होती.