लोकसत्ता टीम

नागपूर : निसर्गाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याच्या संरक्षणाची धुरा उचलली तर निसर्ग अनपेक्षित सुखद अनुभव देतो. असाच सुखद अनुभव निसर्गाने विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणाचे धडे देणाऱ्या करकरे दाम्पत्याना दिला. त्यांच्या पुढ्यात चक्क बिबट उभा ठाकला.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील सूरेवानी येथे विद्यार्थ्यांचे निसर्ग शिबीर सुरू होते. शिबीर संपल्यानंतर सायंकाळी मोकळा वेळ होता. काय करावे या विचारातच गाडी काढून विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणाचे धडे देणारे संजय करकरे व संपदा करकरे हे दाम्पत्य नेचर ट्रेलच्या मार्गाने जावे असा विचार करत होते. सायंकाळचे सव्वा पाच वाजले असल्याने सूर्य मावळतीला गेला होता. सूरेवानीचे हे जंगल जरी बफर क्षेत्र असले तरी झाडांची सुरेख गर्दी आणि विविधता येथे बघायला मिळते. कोणतीही घाई नसल्याने कुसुम, मोहा, पळस, ऐन यासारख्या झाडांच्या अंतरंगात डोकावत आम्ही निवांत जात होतो. रस्त्यावरील पगमार्क इम्प्रेशन पॅड वर (PIP) काही पाऊलखुणा उमटल्या आहेत का हे पण थांबून ते बघत होते. वानर आणि मोराच्या पाऊलखुणा एका पीआयपीवर स्पष्टपणे दिसत होत्या. साधारणत: चार साडेचार किलोमीटर गेल्यानंतर एका पीआयपी वर बिबट्याच्या पावलांची नक्षी बघायला मिळाली. बारीक रेतीत स्पष्टपणे ही नक्षी उमटली होती. याच मऊ रेतीत बिबट्या बसल्याच्या खुणाही स्पष्टपणे दिसत होत्या.

आणखी वाचा- प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडूनही ‘लॉबींग’, थेट शरद पवारांना साकडे…

आदल्या सायंकाळी करकरे दांपत्याने अभिनेता व निस्सिम निसर्ग वेडा सयाजी शिंदे यांच्यासोबत याच मार्गाने फेरी केली होती. त्यावेळेस गेलेल्या गाड्यांच्या टायरचा मागही या पीआयपीवर उमटलेला दिसत होता. बिबट्याचे पंजे अतिशय ताजे होते. ते किती ताजे असावे अशी ते चर्चा करत असतानाच संपदा करकरे म्हणाल्या, ‘अरे कदाचित तो समोर चालतही असेल. चला बघूया’ ! समोर रस्त्यावर किंचित वळण होते. संजय करकरे यांनी गाडी वळवल्याबरोबर खरोखरच रस्त्यावरून बिबट्या समोरच्या बाजूला चालत होता. अवघ्या १०० फुटावरती तो होता. गाडीचा आवाज आल्याबरोबर त्याने मागे नजर वळवली आणि दबक्या पावलाने डावीकडे त्याने उडी मारली. काहीसा आत गेल्यानंतर एका झाडाच्या आडोशाला थांबून त्याने मागे वळून त्यांच्याकडे नजर वळवली. यावेळेस त्यांनी गाडी बंद करून, एक फोटो टिपला. क्षणातच बिबट्याने मान खाली घातली आणि गवतात तो नाहीसाही झाला. अनपेक्षितरित्या बिबट्याचे दर्शन त्यांना कमालीचे सुखावून गेले. कोणतीही अपेक्षा न करता जंगलात फिरत असल्याने बिबट दर्शनाचा हा आनंद कमालीचा वेगळा होता. खूप वर्षापूर्वी ताडोबाच्या जंगलात फिरत असताना या निसर्ग वेड्या व निसर्ग संरक्षणाचे धडे देणाऱ्या दाम्पत्याना अशाच पद्धतीने पंजे बघत जाताना, काही अंतरावर पुढे चालत जाणारी बांडी वाघीण दिसली होती. जंगलात फिरताना येणारा अनुभव नेहमीच आनंद देणारा असतो, असे संजय व संपदा करकरे यांनी सांगितले.