अमरावती : मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. पण, मोसमी पाऊस विदर्भात केव्‍हा पोहचेल, याबाबत सध्‍या भविष्‍यवाणी करणे कठीण असल्‍याचे हवामान तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे.

भारताच्या भूमीवर नैर्ऋत्य मोसमी वारे पहिल्यांदा अंदमान-निकोबार बेटांवर आणि नंतर केरळमध्ये दाखल होतात. तेथून नंतर टप्प्याटप्प्याने मोसमी पाऊस महाराष्ट्र आणि देश व्यापतो. उद्या नैऋत्‍य बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात ईशान्य दिशेला प्रवास करण्याची शक्यता आहे. २४ मे पर्यंत याची तीव्रता वाढून मध्यवर्ती बंगालच्या उपसागरात यांचे रूपांतर डिप्रेशन मध्ये होईल. त्यानंतर सुद्धा या वादळाचा प्रवास ईशान्य दिशेला चालू राहील आणि याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. परंतु या वादळाच्या प्रभावामुळे विदर्भातील बाष्प बंगालच्या उपसागरात निघून जाईल. त्यामुळे विदर्भात वातावरण सर्वसामान्य पणे कोरडे राहील, तथापि या वादळामुळे मोसमी पावसाचा प्रवास गतीमान होण्याची शक्यता असल्याने तो ३१ मे पर्यंत केरळमध्ये पोहचेल, असा अंदाज असल्‍याचे येथील हवामानतज्‍ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : ‘हर घर नल, हर घर जल’ची प्रतीक्षाच! जलजीवन योजनेवर १९८ कोटी खर्च

मोसमी पाऊस विदर्भात केव्हा पोहोचणार, याबाबत सध्या भविष्यवाणी करणे कठीण आहे. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असेही प्रा. अनिल बंड यांनी स्‍पष्‍ट केले आहे. संपूर्ण विदर्भात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ ते ६ अंश सेल्सिअसने अधिक म्हणजे ४० ते ४३ अंश सेल्सिअस दरम्यान राहून पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती जाणवू शकते, असे निरीक्षण हवामान विभागाचे निवृत्‍त शास्‍त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी नोंदवले आहे.

हेही वाचा : वर्धा : वन्यजीव निरीक्षणावेळी मचाणीवरच मिळणार भोजन, ‘ही’ खबरदारी घ्या

उष्णतेची लाट सदृश्य स्थिती असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार २५ मे पर्यन्त ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. २३ व २४ मे असे दोन दिवस दक्षिण महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्‍यात आली आहे. रविवार १९ मे ला अंदमानवर पोहोचलेल्या मान्सूनची आगेकूच कायम असून बंगालच्या उपसागरात आठवड्यादरम्यान कदाचित चक्रीवादळाची बीज-रोवणीही होऊ शकते. अर्थात त्यासंबंधीचे चित्र अजून स्पष्ट व्हावयाचे आहे, असे माणिकराव खुळे यांचे म्‍हणणे आहे.