गडचिरोली: गेल्या ५० तासांपासून छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील करेगुट्टा टेकडी परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु आहे. घनदाट जंगल असलेल्या या टेकडीवर ७०० च्यावर नक्षलवादी असून यात ‘मोस्ट वॉन्टेड’ नक्षलवादी माडवी हिडमा देखील असल्याचा दावा पोलिसांकडून केल्या जात आहे. तब्बल दहा हजारावर सुरक्षा दलातील जवान या ठिकाणी टेकडीला वेढा देऊन खिंड लढवत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.

दक्षिण बस्तर भागातल्या सुकमा जिल्ह्यातल्या पुवर्ती गावातील रहिवासी असलेला माडवी हिडमाने १९९६-९७ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी नक्षल चळवळीत प्रवेश केला. त्याला चळवळीत हिदमाल्लू आणि संतोष या दोन नावांनी ओळखल्या जाते.

नक्षल चळवळीत सामील होण्यापूर्वी हिडमा गावात शेती करायचा. त्याभागातील नागरिक म्हणतात की, तो मितभाषी आहे. त्याला नवनव्या गोष्टी शिकायला आवडतात. जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या हिडमाला हिंदीसह इंग्रजी भाषेचेही ज्ञान असल्याचे बोलल्या जाते. २००० साली त्याला शस्त्र बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. यादरम्यान बजावलेल्या कामगिरीमुळे अनेकांना आश्चर्य वाटले. २००१-०२ च्या आसपास हिडमाला दक्षिण बस्तर जिल्हा तुकडीत पाठविण्यात आले. त्यानंतर तो नक्षलवाद्यांची सशस्त्र तुकडी ‘पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी’मध्ये सहभागी झाला.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार २००१ ते २००७ पर्यंत नक्षल चळवळीत हिडमा एक सामान्य सदस्य होता. बस्तरमधील सलवा जुडून मोहिमेनंतर तो अधिक आक्रमक झाला. २००७ साली बस्तरमधील उरपल मेट्टा चकमकीत २४ पोलीस जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्याचे नेतृत्व हिडमाने केले होते. समोरासमोरच्या लढाईत नियोजनबद्द पद्धतीने हल्ला करण्याची रणनीती हिडमामुळे अधिक बळकट झाल्याचे जाणकार सांगतात. याच कामगिरीमुळे त्याला २००८ -०९ मध्ये नक्षलवाद्यांच्या पहिल्या बटालियनचा कमांडर बनविण्यात आले.

२०१० साली ताडमेटलामध्ये झालेल्या चकमकीत ७६ जवान शहीद झाले होते. यातही हिडमाने प्रमुख भूमिका बजावली होती. यानंतर २०११ मध्ये त्याला दंडकारण्य स्पेशल झोन कमिटीचा सदस्य म्हणून बढती देण्यात आली. हिडमाच्या बाबतीत एका गोष्टीची चर्चा खूप होते, ती म्हणजे तो चकमकीदरम्यान नक्षलवाद्यांचे नेतृत्व करतो, पण स्वतः फार कमी वेळा बंदूक उचलतो.

नक्षल चळवळ सोडलेल्या काहींच्या मते, संघटनेतही हिडमाविषयी चर्चा व्हायची, हिडमाच्या लढाईची पद्धत आक्रमक होती, त्याने अनेक लढायांमध्ये भागही घेतला पण तो स्वतः फार कमी वेळा बंदूक चालवतो. कधी चकमकीत तो जखमी झाल्याचे कानावर आले नाही. विविध राज्यात त्याच्यावर कोट्यवधीचे बक्षीस आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून तो पोलिसांच्या ‘रडार’वर होता. चकमक सुरु असलेल्या करेगुट्टा टेकडी परिसरातील तो असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्याचे काय होणार हे चकमकीनंतरच समोर येण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बस्तरचा ‘हिरो’

स्थानिक आदिवासी हिडमाबद्दल बस्तरचा ‘हिरो’ म्हणून उल्लेख करतात. स्थानिकांशी त्याचे चांगले संबंध आहेत. विशेष करून युवा वर्गामध्ये त्याची ‘क्रेज’ दिसून येते. ते म्हणतात हिडमा जेव्हा येतो तेव्हा सर्वांचे म्हणणे शांतपणे एकूण घेतो आणि लिहुनही घेतो. आजपर्यंत त्या भागात नक्षलवाद्यांचे समांतर सरकार चालत असल्याने तेथील जनतेला सरकारपेक्षा नक्षलवादी जवळचे वाटायचे. त्यातूनच शेकडो जवानांचा बळी घेणाऱ्या हिडमासारख्या कुख्यात नक्षलवाद्याला स्थानिक हिरो समजायचे.