नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यात पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेले काँग्रेस पक्षाचे सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी आज रद्द करण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून तशी अधिसूचना काढण्यात आली आहे. कोणत्याही लोक प्रतिनिधीला दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली असेल तर त्यांचे सदस्यत्व रद्द होते, अशी तरतूद लोकप्रतिनिधी कायद्यात आहे. त्यानुसार केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. मात्र या निर्णयावर काँग्रेसचे प्रदेशाधक्ष नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. आज रविवार असतानाही सदस्यत्व रद्द करण्याची घाई केला, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले नाना पटोले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “देशामध्ये दोन कायदे निर्माण झाले की काय? अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. भाजपाचे गुजरातमधील खासदार नारणभाई काछडीया यांना उच्च न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तरी त्यांची खासदारकी लगेच रद्द करण्यात आली नाही. त्याना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा वेळ दिला गेला. तिथे त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली गिली. इतर राज्यात भाजपा आमदारांची अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे खालच्या न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांची वाट पाहिली गेली आहे.”

हे वाचा >> बँक घोटाळ्यात शिक्षा झालेले काँग्रेस नेते सुनील केदार यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द

“सुनील केदार यांच्या प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना वरच्या न्यायालयात जाण्यासाठी वेळ द्यायला हवा होता. पण केदार यांच्या प्रकरणात आज रविवार असतानाही तातडीने विधानसभा सदस्य रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला. सदसत्व रद्द करण्याची विधानभवनाला एवढी काय घाई होती?”, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.

नाना पटोले यांनी भाजपावर टीका करताना म्हटले की, भाजपाचे लोक गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतले जातात. हे तथ्य त्यांचेच नेते आम्हाला सांगतात. ही जी प्रथा देशात आणि महाराष्ट्रात सुरू झाली आहे, ती जास्त दिवस चालणार नाही. सुनील केदार ही कायदेशीर लढाई लढतील आणि यातून बाहेर पडतील. आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे.

आणखी वाचा >> शिंदे गटातील आमदाराची अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; स्पष्टीकरण देत म्हणाले, “त्याची बोलण्याची पद्धत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदे-अजित पवार गटाला गोळी घालण्याचा अधिकार

शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरूडच्या महावितरण अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नाना पटोले यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे लोक वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेलेले लोक आहेत. त्यांनी बंदुकीच्या गोळ्या घातल्या, हवेत गोळीबार केला तरी त्यांना शिक्षा होणार नाही, त्यांना मोकळीक दिली आहे. भाजपाने आज राज्यात अराजकता निर्माण करून ठेवली आहे. सत्तापक्षातले आमदार अधिकाऱ्यांन रोज धमकावताना दिसतात, असा आरोप पटोले यांनी केला.