अमरावती : अमरावती ते मुंबई या हवाई मार्गावर अलायन्स एअरकडून चालविण्यात येणाऱ्या विमानसेवेची भाडेवाढ कमी करून प्रवाशांच्या मागणीनुसार वेळत बदल करावा, अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. काही दिवसांपुर्वी माजी खासदार नवनीत राणा यांनी देखील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक स्वाती पांडेय यांना भाडेवाढीबद्दल फोनद्वारे विचारणा केली होती. अमरावती-मुंबई विमानप्रवास सेवेच्या भाड्यांमध्ये अलीकडील काळात झालेल्या दरवाढीमुळे प्रवाशांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ही विमानसेवा सामान्य प्रवाशांसाठी सुलभ आणि परवडणारी रहावी, यासाठी खासदार बळवंत वानखडे यांनी पुढाकार घेतला आहे.
अमरावती हे विदर्भातील महत्त्वाचे शहर असून येथे औद्योगिक, शैक्षणिक आणि प्रशासनिक कामकाजासाठी मुंबईत सतत प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत विमानसेवेच्या भाड्यांमध्ये झालेली अनावश्यक वाढ ही सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे तातडीने भाडेवाढीचा फेरविचार करून ती पूर्ववत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, सद्यःस्थितीत अमरावती मुंबई विमान प्रवासाचा वेळ दुपारी असल्यामुळे अनेक व्यावसायिक आणि कर्मचारी वर्गाला त्याचा फारसा उपयोग होत नाही. अमरावतीहून मुंबईकडे जाण्याची वेळ सकाळी आणि मुंबईवरून परत येण्याची वेळ संध्याकाळी ठेवण्यात यावी, जेणेकरून अमरावतीकर एका दिवसात आपले काम आटपून परत येऊ शकतील, अशीही विनंती खासदार बळवंत वानखडे यांनी मंत्र्यांकडे केली आहे. नागरी उड्डाण मंत्र्यांनी वानखडे यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले. संबंधितांकडून तातडीने अहवाल मागवण्यात येईल आणि प्रवाशांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन राम मोहन नायडू यांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे.
अमरावती विमानतळावरून उडान योजनेअंतर्गत प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानाच्या एकूण प्रवासी संख्येच्या पन्नास टक्के प्रवाशांसाठी आमचे सरकार अनुदान देते. पण, जेव्हा येथील व्यापारी किंवा उपचारासाठी जाणारे रुग्ण तातडीच्या कामांसाठी विमानाच्या तिकिटांचे बुकिंग करतात, तेव्हा काही वेळा विमानाचे उड्डाण रद्द झाल्याचे त्यांना कळते. या अमरावती विमानसेवेसाठी सुमारे ९ ते १० हजार रुपये प्रवास भाडे बुकिंगच्या वेळी दिसते. हा प्रकार काय आहे, अशी विचारणा भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी एमएडीसीच्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापक संचालक स्वाती पांडेय यांना फोनद्वारे केली होती.