लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर: पारंपारिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडल्यानंतर नवरी सासरी नांदायला आली. मात्र, तिसऱ्याच दिवशी नवरी उलट्या करायला लागल्याने कुटुंबात दबक्या आवाजात चर्चा झाली. नवरदेवाने तिला रुग्णालयात नेऊन तपासणी केली. डॉक्टरांनी पती-पत्नीचे अभिनंदन करीत गोड बातमी दिली. मात्र, नवरदेवाने डोक्याला हात मारून घेतला आणि तिला माहेरी सोडून दिले. या प्रकरणी नवरीने सर्व हकीकत सांगितल्यानंतर सर्वांनी तोंडात बोटे घातली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी ही कन्हानजवळील एका खेड्यात राहते. तिचे आईवडिल शेतमजूर आहेत. नातेवाईक असलेला युवकाचे तिच्यासाठी स्थळ आले. आईवडिलांनी नातेवाईकांना बोलावून पारंपारिक पद्धतीने मुलीचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिले. विवाहसोहळा व्यवस्थित पार पडल्यामुळे दोन्ही घरात आनंद होता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरीला घ्यायला वराकडील मंडळी आली. पाहुणचार ओटापून मुलगी सासरी रवाना झाली. सासरी आल्याआल्याच तिसऱ्या दिवशी नवख्या सुनेला उलट्या होत होत्या.

हेही वाचा… विनापरवानगी आंबे विकले म्हणून RPF जवानांनी खाल्ले आंबे; तक्रार घेण्यासही नकार

उन्हामुळे प्रकृती खराब झाल्याचे समजून पतीने तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पती-पत्नीचे अभिनंदन केले आणि पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे पतीच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने डॉक्टरांचे आभार मानून पत्नीसह घर गाठले. रात्री कुटुंबियांना माहिती देण्यात आली. सर्वांनी तिची विचारपूस करीत बाळाच्या वडिलाबाबत विचारणा केली. मात्र, ती काहीही बोलायला तयार नव्हती. तिच्या वडिलांना बोलावले आणि मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. सासरी असलेल्या मुलीला घेऊन वडिलांनी घर गाठले. कुुटुंबियांनी तिला आस्थेने विचारपूस केल्यानंतर ती रडायला लागली. तिने लग्नापूर्वी घडलेली सर्व हकिकत कुटुंबियांना सांगितली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेजारी युवक निघाला आरोपी

आईवडिल शेतात गेल्यानंतर मुलगी घरी एकटीच राहत होती. तिच्या घराशेजारी राहणारा आरोपी अजय खन्ना याने मुलीला जाळ्यात ओढून वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातूनच ती गर्भवती राहिली. यादरम्यान तिचे लग्न ठरले. त्यामुळे गर्भवती असल्याबाबत तिने कुणालाही सांगितले नाही. लग्नानंतर पतीच्या सतर्कतेमुळे तरुणीचे बींग फुटले. या प्रकरणी अजय खन्ना याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.