महेश बोकडे

नागपूर : शासनाने जून-२०२२ मध्ये विदेशी मद्य विक्री करणाऱ्यांना विदेशी मद्य दुकान लिहिण्याबाबत अधिसूचना काढली. परंतु राज्यातील ८० टक्के दुकानांवर अद्यापही वाईन शाॅपच नमूद आहे. त्यामुळे विविध फळांपासून तयार वाईनकडे बघण्याचा दृष्टिकोन वाईट होत असल्याचा आरोप नागपूरसह इतर ठिकाणच्या वाईन क्लबकडून करण्यात आला आहे.

विविध फळांपासून वेगवेगळ्या प्रकारची वाईन बनवली जाते. त्यात जांभूळ, डाळिंब, पेरू, गाजर, काकडी, मुळा, केळी, मोसंबी, संत्री, चिकू, सीताफळ, महुवा, टोमॅटो, सफरचंद, द्राक्ष, किवी, आंबा इत्यादींचा समावेश आहे. देशात मात्र वाईन शॉपच्या नावावर विदेशी मद्य (दारू) विक्री होत असल्याने समाजात गैरसमज पसरत आहे, असे नागपूर वाईन क्लबचे संचालक दीपक खानुजा म्हणाले.

हेही वाचा >>>पारवे, कडूंना एक, तर केदारांना दुसरा न्याय का? आमदार अपात्रतेप्रकरणी काँग्रेसचा सवाल

देशात फळांचे विपुल उत्पादन होते. मात्र जाचक अटींमुळे आणि गैरसमजांमुळे या फळांवर आधारित उद्योग उभे राहत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचेही खानुजा यांनी सांगितले. शासनाने ८ जून २०२२ रोजी अधिसूचना काढून विदेशी मद्य विक्री करणाऱ्या दुकानांवर विदेशी मद्य विक्री दुकान असे स्पष्ट नमुद करण्याचे आदेश दिले. त्यानंतरही राज्यातील बहुतांश विदेशी मद्य विक्री दुकानांवर वाईन शाॅप असेच नमूद आहे. त्यामुळे वाईन शाॅप हा शब्द हटवून विदेशी मद्य विक्री दुकान हे फलक लावण्याबाबत नागपूर वाईन क्लबसह इतरही क्लबकडून विविध भागात अबकारी शुल्क विभागाकडे निवेदन देण्यात आले. परंतु काहीच झाले नाही. शासन या फलकांची दुरुस्ती कधी करणार, असा प्रश्नही खानुजा यांनी केला.

हेही वाचा >>>मानगुटीवरील ‘भूत’ उतरविण्यास प्राधान्य द्या; प्रकाश आंबेडकर यांचा ‘इंडिया’ आघाडीला सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अडचण काय?

विदेशी मद्य विक्री दुकानांच्या फलकावरील वाईन शाॅप हे शब्द हटवून विदेशी मद्य विक्री दुकानाचे फलक लावण्यापूर्वी संबंधित व्यावसायिकाला गुमास्ता, बँक खाते, विदेशी मद्य विक्री दुकानासह इतरही कागदपत्रांवर दुरुस्ती करावी लागणार आहे. या दुरुस्तीसाठी टाळाटाळ होत असल्याने शासनाच्या अधिसूचनेची पायमल्ली होत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.