नागपूर : हिवाळी अधिवेशन काळात दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय जनता पक्षाचे विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य उद्या, मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्मृती मंदिर येथे जाणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना बौद्धिक दिले जाणार आहे. मात्र, राज्यात शिंदे- फडणवीस सरकार असताना भाजपच्या सदस्यासोबत शिंदे गटाचेही आमदार जाणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांसह पक्षाचे सर्व मंत्री, सदस्य आणि राज्यातील प्रमुख पदाधिकारी स्मृती मंदिरात दर्शनासाठी जातात. दोन वर्ष करोनामुळे अधिवेशन झाले नाही. आता राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर स्मृती परिसरात दर्शनासाठी जाणार आहे. त्यासाठी भाजपच्या सर्वच सदस्यांनी उद्या सकाळी ७ वाजेपर्यत रेशिमबागेतील स्मृती परिसरात उपस्थित राहावे, असे आदेश पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार आशिष शेलार यांनी काढले आहे. त्यासाठी आमदार निवाससमोरुन सर्व सदस्यांना घेऊन जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा: दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या युवासेना पदाधिकाऱ्याचा धिक्कार असो; शिंदे गटाची घोषणाबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर काही आमदार व मंत्री स्वत:च्या गाडीने पोहचणार आहे. रेशिमबागेत स्मृती मंदिर परिसरात न गेलेल्या सदस्यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली होती. तेव्हापासून शक्यतो सर्वच सदस्य संघाच्या या भेटीला अनुपस्थित राहण्याचे टाळतात. भाजपने या संदर्भात आदेश काढले असले तरी शिंदे गटाकडून मात्र तरी कुठलेही आदेश काढण्यात आले नसल्याची माहिती शिंदे गटाच्या एका आमदाराने दिली. उद्या सकाळी स्मृती मंदिर परिसरात आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गुरुजी यांच्या समाधीचे सर्वच आमदार दर्शन घेणार आहे. त्यानंतर सर्व मंत्री व आमदारांचा परिचय होणार असून त्यानंतर संघाचे पदाधिकारी विविध सेवा उपक्रमाची माहिती देतील.