अकोला: मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून प्रवासी सुविधा व सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. प्रवासी सुरक्षेसह कार्यक्षमता वाढविणे, रेल्वे वाहतूक सुरळीत करणे आणि प्रवासाचा कालावधी कमी करणे यावर भर दिला जात आहे. या उद्दिष्टांनुसार प्रवासी ‘रनिंग लूप लाईन्स’चे उन्नतीकरण हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. उच्च गती व व्यस्त मार्गांवरील रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हे कार्य उपयुक्त ठरणार आहे.
एप्रिल २०२५ मध्ये भुसावळ विभागातील लासलगाव, नायडोंगरी, शिरसोली, वाघोदा, बोदवड व न्यू अमरावती या प्रमुख स्थानकांवरील प्रवासी ‘रनिंग लूप लाईन्स’चे उन्नतीकरण यशस्वी पूर्ण करण्यात आले. हे काम रेल्वे मंडळाच्या निर्देशांनुसार व्यापक पायाभूत सुविधा सुधारणा योजनेंतर्गत करण्यात आले. या कामादरम्यान भारतीय रेल्वेच्या सर्व सुरक्षा व देखभाल मानकांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यामध्ये विविध तांत्रिक कार्याचा समावेश आहे.
‘लूप लाईन’खाली किमान १५० मिमी स्वच्छ गिट्टीचे कुशन प्रदान करून रेल्वे मार्गाची स्थिरता सुनिश्चित करण्यात आली.
रेल्वे मार्गाच्या समांतरतेस व दीर्घकालीन भूमितीची अचूकता राखण्यासाठी ‘मशिन टॅम्पिंग’ तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य करण्यात आला. या उन्नतीकरणामुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायक व सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. उन्नत ट्रॅक भूमितीमुळे घसरणीच्या घटनांमध्ये घट होईल तसेच गुणवत्तापूर्ण गिट्टी कुशन व ‘मशिन टॅम्पिंग’मुळे रेल्वे मार्ग दीर्घकाळ टिकून राहील आणि वारंवार देखभालीची गरज कमी होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
६५ यार्ड्सवरील प्रवासी ‘रनिंग लूप लाईन्स’चे कार्य
भुसावळ विभागातील सर्व ६५ यार्ड्सवरील प्रवासी ‘रनिंग लूप लाईन्स’चे उन्नतीकरण डिसेंबर २०२५ पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे कार्य गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यासाठी विभाग वचनबद्ध आहे.
भुसावळ-खंडवादरम्यान विशेष तपासणी
रेल्वे सुरक्षेला बळकटी देण्याच्या आणि पायाभूत सुविधांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने भुसावळ ते खंडवा या प्रमुख मार्गावर ‘ऑस्सिलेशन मॉनिटरिंग सिस्टम’ विशेष तपासणी गाडीचे यशस्वी संचालन केले. ही विशेष तपासणी गाडी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून, ट्रॅकच्या भूमितीवर सतत नजर ठेवण्यास सक्षम आहे. प्रत्यक्ष वेळेत ट्रॅकमधील कोणतीही अयोग्यता अथवा बिघाड तत्काळ ओळखण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरते.