लोकसत्ता टीम

अमरावती: आपला ओटीपी किंवा पिन कोणालाही शेअर करू नये. विशेष म्हणजे डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करता पासवर्ड किंवा पिन कोणालाही शेयर करू नये, असे आपल्याला अनेकदा सांगितले जाते. याशिवाय जर तुमच्या मोबाईल वर कोणत्याही प्रकारचा ओटीपी किंवा लिंक येत असेल तर यावर चुकूनही क्लिक करू नये. असे केल्याने आपल्या बँक खात्‍यातील पैसा उडवला जाऊ शकतो.

पण आता सायबर गुन्‍हेगारीचा एक नवा प्रकार समोर आलाय. या चोरीमध्ये कोणत्याही ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा लिंक शिवाय तुमच्या बँक खात्‍यातील रक्‍कम लंपास केली जाऊ शकते. अमरावतीत एका महिलेसोबत असा प्रकार घडलाय. या महिलेच्‍या खात्‍यातून एकूण १ लाख २७ हजार रुपये लंपास करण्‍यात आले आहेत.

आणखी वाचा- अमरावती: वाहन व्‍यावसायिकाची १३ लाखांची फसवणूक

तक्रारकर्ती महिला ही कपडे आणि दागिन्‍यांचा व्‍यवसाय करते. यामुळे कुरियरशी संबंधित नोकरदारांशी त्‍यांचे संभाषण होत असते. गेल्‍या ५ एप्रिलला वेगवेगळ्या सहा मोबाईल क्रमांकावरून या महिलेला कॉल आले. तुमचे कुरियर डिअॅक्टिव्‍हेट झाले असून, ते अॅक्टिव्‍हेट करण्‍यासाठी दिलेल्‍या लिंकवर पाच रुपये पाठविण्‍यास या व्‍यावसायिक महिलेला सांगण्‍यात आले. मात्र, महिलेने त्‍या लिंकवर पैसे पाठवले नाहीत. दरम्‍यान, ८ एप्रिल रोजी या महिलेल्‍या दोन बँक खात्‍यातून पहिल्‍यांदा २७ हजार ९०० रुपये आणि नंतर ९९ हजार ३९६ रुपये वळते झाले. महिलेने तत्‍काळ सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्‍यानंतर लगेच ९ एप्रिल रोजी देखील त्‍यांच्‍या खात्‍यातून ९ हजार ९९९ रुपये आणि १ हजार ९५६ रुपयांची परस्‍पर कपात झाली. आपली पुन्‍हा फसवणूक झाल्‍याचे लक्षात येताच त्‍यांनी पुन्‍हा सायबर पोलीस ठाणे गाठले. मात्र, यावेळी त्‍यांना खोलापुरी पोलीस ठाण्‍यात तक्रार नोंदविण्‍यास सांगण्‍यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या महिलेच्‍या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी आज अज्ञात आरोपीच्‍या विरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे. आपण कुणालाही ओटीपी शेअर केला नाही, कुठलाही धोकादायक अॅप डाऊनलोड केला नाही. कुठल्‍या संकेतस्‍थळावरून व्‍यवहार केले नाही, तरी देखील आपल्‍या खात्‍यातील रक्‍कम कपात कशी झाली, असा प्रश्‍न या महिलेने उपस्थित केला असून पोलिसांसमोर आता या सायबर भामट्याला हुडकून काढण्‍याचे आव्‍हान आहे.