नागपूर: आई कामावरून परतल्यानंतर तिला दिवसभरातल्या गमती जमती सांगू, तिच्या हातून प्रेमाचे चार घास खाऊ म्हणून दाराकडे एकटक पाहत आस लावून बसलेला तिसरीत शिकरणारा मुलगा आणि आठवीत शिकणाऱ्या मुलीच्या डोक्यावरील मातृत्वाचा पदर वाटेत दबा धरून बसलेल्या काळाने हिरावून घेतला. भरधाव वेगात गाडी चालविणाऱ्याने कट मारल्याने मुलांच्या ओढीने घरी परतणाऱ्या एका महिलेला दुचाकीवरून पडल्याने प्राण गमवावे लागले.
ममता पवन मिश्रा (४०, त्रिशरण नगर, खामला) असे अपघातात दगावलेल्या महिलेचे नाव आहे. ममता या निषनगरातील तनिष्क ज्वेलर्स येथे व्यवस्थापिका म्हणून काम करत होत्या. वर्धमान नगरात एका सहकाऱ्याच्या घरी हरियाली तीजचा कार्यक्रम असल्याने त्या आणखी दुसरी सहकारी दिशा राणेसोबत वर्धमान नगरात गेल्या. तेथून सायंकाळच्या सुमारास त्या कार्यालयात परत जात असताना रामटेके नगरकडून पद्मावती टी पॉईंटकडे जात असताना गुरू पेट शॉप दुकानाजवळ भरधाव वेगात गाडी चालविणाऱ्या एकाने त्यांना पाठीमागून कट मारला.
यामुळे ममता यांचे दुचाकीवरील संतुलन बिघडले व दोघीही दुचाकीसह खाली पडल्या. दोघींच्याही हातापायाला दुखापत झाली. त्या प्रथमोपचारासाठी त्या लगेच मनिषनगरातील संजीवनी रुग्णालयात गेल्या. तेथे ममता यांना पाठीत दुखणे उमळले व त्यांची दातखीळ बसली. त्यांना तातडीने बैद्यनाथ चौकातील अरिहंत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती पवन मिश्रा यांना हा प्रकार कळवण्यात आला. दिशाच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पित्याच्या काळजात कालवाकालव
आई घरी आल्यावर तिच्या हातून जेवण करू दिवसभरातील गमतीजमती तिला सांगू या विचारात तिसरीत शिकणारा मुलगा आणि आठवीत शिकणारी त्याची दिदी दोघेही आईच्या परतीकडे आस लावून बसले होते. मात्र वाटेत दबा धरून बसलेल्या काळाने घात केल्याने या कुटुंबाचा दुःखाचे आभाळ कोसळले आहे. शून्यात हरविलेल्या मुलांकडे पाहताना पित्याच्या काळजाची कालवाकालव होत आहे.
यू टर्नच्या भयाने वाहनचालक बेताल
मद्य प्राशन करून वाहने चालविणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी ऑपरेशय यू टर्न ही मोहिम हाती घेतली आहे. ही मोहीम योग्य असली तरी वाहनचालकांवर कशाचेही नियंत्रण राहिलेले नाही. पोलिसांच्या भयाने वाहन चालक सर्रास विरुद्ध दिशेने गाड्या चालवताना दिसतात. आपण चुकीच्या मार्गावर जात आहोत, याचे कसलेही भय राहिलेले नाही. दुचाकीच नव्हे तर चार चाकी वाहनचालकही सर्रास विरुद्ध दिशेने गाड्या पळवतात. याच्यावरही पोलिसांनी कारवाई करून अद्दल घडवणे गरजेचे झाले आहे.