लोकसत्ता टीम

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या महिलेचे १५ दिवसांचे बाळ रुग्णालयात दाखल होते. सासरच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. गोदावरी राजेश खिल्लारे (२५, रा.वाशीम) असे मृत महिलेचे नाव आहे.

वाशीम येथील गोदावरी खिल्लारे यांचे १५ दिवसाचे बाळ सर्वोपचार रुग्णालयातील एनआयसीयू कक्षात दाखल होते. बाळावर उपचार सुरू असतानाच १५ मार्चपासून गोदावरी खिल्लारे बेपत्ता झाल्या. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली. आज रुग्णालयाचे सफाई कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी आले. त्यांना शौचालयाचा दरवाजा आतून बंद दिसला. कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला असता त्यांना आतमध्ये महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता.

आणखी वाचा- Video: ‘टोल’ वाचवण्यासाठी चालकाने केले असे की…; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याची माहिती पोलिसांना देण्यात आली. शहर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. एनआयसीयू कक्षात दाखल बालकांना इतरत्र हलविण्यात आले आहे. महिलेने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सासरच्या मंडळींनी मानसिक त्रास दिल्यानेच महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.