अमरावती : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महानगरपालिकांना प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार मंगळवारी (३१ मे) अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण‍ सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीनुसार महापौर चेतन गावंडे यांच्यासह काही प्रस्थापितांवर पर्यायी प्रभाग निवडण्याची वेळ आली आहे. सर्वच प्रभागांमध्ये एक जागा सर्वसाधारण उमेदवारासाठी खुली असल्याने वजनदार नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.

या आरक्षण सोडतीमध्ये काही प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसला आहे. एका प्रभागातून तीन सदस्य निवडून येणार आहेत. तब्बल ११ प्रभागांमध्ये दोन महिला सर्वसाधारण आणि एक पुरूष सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे अनेक प्रस्थापित नगरसेवकांना पत्नी किंवा निकटच्या नातेवाईक महिलेला उमेदवारी देऊन लढत देण्याचा पर्याय निवडावा लागणार आहे.

अमरावती महापालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी एकूण ३३ प्रभाग आहेत. एकूण सदस्‍य संख्‍या ९८ असून त्‍यामधून तीन सदस्‍यांचे ३२ प्रभाग व दोन सदस्‍यांचा १ प्रभाग आहे. १७ जागा अनुसुचित जातींसाठी राखीव झाल्या आहेत. त्यात प्रभाग क्र.१, २, ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, २३, २७, २८, ३०, ३१, ३२, ३३ चा समावेश आहे. यापैकी आरक्षण सोडतीद्वारे ९ जागा महिला सदस्‍यांसाठी झाल्या आहेत. त्यात प्रभाग क्रमांक ११, १२, १३, १४, १५, २३, २८, ३१ आणि ३३ चा अंतर्भाव आहे.

प्रभाग क्र.१० व १२ यामध्‍ये अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती दोन्‍हींसाठी एक-एक जागा आरक्षित आहे. त्यातील प्रभाग क्रमांक १० मधील १ जागा अनुसूचित जमाती महिला व प्रभाग क्रमांक १२ मधील एक जागा अनुसूचितसाठी राखीव झाली आहे.

हेही वाचा : नागपूर महापालिकेतील ५२ प्रभागांच्या महिला आरक्षणाची सोडत, कुठं कोणत्या पक्षाची अडचण? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वसाधारण महिलांकरीता एकूण ३९ जागा आरक्षित आहेत. त्‍यापैकी ३० जागा राज्‍य निवडणूक आयोगाद्वारे थेट आरक्षित करण्‍यात आल्या आहेत. त्यात प्रभाग क्र. १ ते ९, ११ आणि १३ ते ३२ चा समावेश आहे. प्रभाग क्र.३३ हा दोन सदस्‍यांचा प्रभाग आहे. यातील १ जागा अनुसुचित जातीतील महिलेसाठी राखीव झाला आहे.