लोकसत्ता टीम

नागपूर: प्रेयसीचे लग्न तोंडावर असताना कराटे प्रशिक्षक असलेल्या प्रियकराने तिचे अश्लील छायाचित्र ‘इंस्टाग्राम’वर प्रसारित केले. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून प्रियकर आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोपाल हा कराटे प्रशिक्षक असून तो विवाहित आहे. त्याने गावातच राहणारी संजना (काल्पनिक नाव) हिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला वेगवेगळे आमिष दाखवले. त्यामुळे तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडली. गोपालने तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गोपालची कराटे प्रशिक्षण केंद्रातील काही अल्पवयीन मुलींवरही वाईट नजर होती. त्याने प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली काही विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केले. तर सहा विद्यार्थिनींना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केला. एका मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आईच्या सतर्कतेमुळे गोपालचे कारनामे उघडकीस आले होते. त्याच्या विरुद्ध कन्हान पोलीस ठाण्यात तब्बल ६ मुलींनी बलात्कार केल्याची तक्रार दाखल आहे.

आणखी वाचा- मोकाट श्वानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागपूर महापालिका उपाययोजना करण्यात अपयशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही बाब त्याच्या प्रेयसीला कळली. तिने त्याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध तोडले. तिनेही पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली. त्या गुन्ह्यात गोपाल सहा महिने कारागृहात होता. गेल्या १५ दिवसांपूर्वीच तो कारागृहातून जामिनावर सुटून आला. त्याला प्रेयसीचे लग्न ठरले असून येत्या मे महिन्यात लग्न होणार असल्याचे कळले. त्याने तिची भेट घेतली आणि ‘लग्न केल्यास तुझे अश्लील फोटो इंस्टाग्रामवर टाकून व्हायरल करेन आणि तुझे लग्न मोडणार’ अशी धमकी दिली. त्याच्या धमकीला ती जुमानली नाही. ११ एप्रिलला त्याने इंस्टाग्रामवर तिचे २४ फोटो व्हायरल केले. तसेच तिचे काही फोटो तिच्या होणाऱ्या पतीलाही पाठवले. त्यामुळे नातेवाईकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे प्रेयसीने वाद मिटवण्यासाठी प्रियकर आणि त्याच्या पत्नीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्याला अटक केली.