नागपूर : उपराजधानीतील एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. येथील एका बिअरबारमध्ये चक्क दारूचे घोट घेत शासकीय फायलींवर काम सुरू असल्याचे या व्हिडीओत दिसून येत आहे. उपराजधानीतील मनिषनगर परिसरातील बिअरबारचा आणि दुपारच्या सुमारास घेतलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तीन व्यक्ती एक टेबलावर बसून आहेत आणि त्यातील.  एक जण दारूचे घोट घेत शासकीय फायलींना पडताळताना व्हिडिओत दिसून येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या फायलींचा गठ्ठा घेऊन बारमध्ये बसलेले ‘हे’ अधिकारी नेमके कोण होते, ‘ते’ कोणत्या विभागाचे होते आणि ‘त्यांनी’ कोणत्या महत्त्वाच्या फायलींवर बारमध्ये येऊन दारूचा घोट घेत पडताळत होते. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

तर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी दारूचे घोट रिचवत बीअर बारमध्ये चक्क ‘शासन’ सुरू केल्याची टीका आता समाज माध्यमांमधून केली जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच या व्हिडिओमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले  आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या या शहरात नेमके चालले काय, असाही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

 नागपुरातील मनीषनगर भागातील एका प्रसिद्ध बीअर बारमधील हा प्रकार असून दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तीन व्यक्ती बारमध्ये आलेत. त्यावेळी त्यांनी आपल्या सोबत एक फायलींचा मोठा गठ्ठा देखील आणला होता. त्यांनी दारूची ऑर्डर दिली आणि त्यानंतर टेबलावर शासकीय फायलींचा गठ्ठा खोलून त्यांची पडताळणी करण्यास सुरुवात केली. मात्र, हे अधिकारी नेमके कोण आणि कोणत्या विभागाचे आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. दरम्यान या बारमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

ही घटना घडल्याचे समजताच जर पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन रविवार दुपारचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास, ‘हे’ अधिकारी कोण होते आणि ‘त्यांनी’ कोणत्या महत्त्वाच्या फायर्लीवर सह्या केल्या, हे कळू शकेल. मात्र, हा प्रकार उघड झाला असताना प्रशासन किंवा पोलीस या प्रकरणात कितपत लक्ष घालणार आणि दोषींवर कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, असाच एका प्रकार यवतमाळच्या नेर येथे घडला आहे. यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातील अधिकारी वसुलीसाठी गेले असता ऑन ड्युटी धाब्यावर ओली पार्टी केल्याचे समोर आले आहे. यात महिला कर्मचारी देखील असल्याचे सांगण्यात येते. यावेळी महिला कर्मचारी मद्यप्राशन करून अर्वाच्च भाषेचा वापर करीत आहे. हा व्हिडिओ सध्या जिल्ह्यात सोशल मीडियावर गावातीलच एका व्यक्तीने व्हायरल केला आहे. जिल्ह्यात या महिला कर्मचाऱ्याचा व्हिडीओ चांगलाच वायरल होत आहे.