कलावंतांची रंगभूमी दिनी कार्यक्रमांकडे पाठ; समाजमाध्यमांद्वारे शुभेच्छा देऊन सोपस्कार उरकला!

राज्यात जागतिक रंगभूमी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असत, मात्र उपराजधानीत अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या दोन शाखा अनेक नाटय़विषयक चळवळीत काम करत असताना कलावंतांनीच उदासीनता दाखवत रंगभूमी दिनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. केवळ सोशल मिडियाचा उपयोग करून ‘व्हॉटसअ‍ॅप्’च्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देत त्यांनी रंगभूमी दिन साजरा केला.

उपराजधानीत सांस्कृतिक चळवळ वाढावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नवोदित कलावंत नाटय़ स्पर्धेच्या निमित्ताने आपापल्या परीने प्रयत्न करीत असले तरी गेल्या काही वर्षांत रंगभूमीच्या सेवेत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या दोन्ही शाखांमधील पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कार्यक्रमाची संख्या रोडावली आहे.

गेल्या काही वर्षांत नाटय़ स्पर्धेच्या निमित्ताने नवोदित कलावंत एकत्र येऊन स्वतंत्रपणे उपक्रम राबवित, मात्र नाटय़ परिषदेचा त्यात फारसा सहभाग नसतो. जागतिक रंगभूमी दिन असल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग करून अनेक कलावंतांनी एकमेकांना ग्रुपवरच रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देत या दिवसाची आठवण करून दिली असली तरी प्रत्यक्षात मात्र काही कलावंतांचा अपवाद वगळता परिषदेच्या एकाही पदाधिकाऱ्याने कार्यक्रमाचे आयोजन केले जावे अशी साधी सूचनाही केली नाही.

विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवासच्यावतीने रंगभूमी दिन साजरा केला जात असून अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असला तरी उपराजधानीत अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या शहरात दोन शाखा असताना किमान एका नाटय़ शाखेकडून जागतिक रंगभूमीचा कार्यक्रम व्हावा, अशी अनेक कलावंतांची अपेक्षा होती, मात्र पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली.

पदाधिकाऱ्यांची नावे कागदावरच

अखिल भारतीय नाटय़ परिषदेची एक शाखा नागपुरात असताना कलावंतांमधील आपसी हेवेदावे बघता काही कलावंतांनी एक वेगळा गट स्थापन करून नाटय़ परिषदेची महानगर शाखा सुरू केली आणि त्याला मध्यवर्ती शाखेने परवानगीही दिली. या महानगर शाखेने मोठा गाजावाजा करीत उद्घाटन केले, मात्र गेल्या दोन वर्षांत फारसे कुठलेही रंगभूमीच्या क्षेत्रात उपक्रम राबविल्याचे दिसून आले नाही. नाटय़ परिषदेच्या दोन्ही शाखांमधील पदाधिकाऱ्यांची नावे कागदावर असली तरी प्रत्यक्षात कुणीच समोर येत नाही. नाटय़ परिषदेची १५ सदस्यीय कार्यकारिणी असून त्यात काही राजकीय नेत्यांसह कलावंतांचा समावेश आहे. मात्र त्यापैकी कोणालाही रंगभूमी दिनाचा कार्यक्रम करावा, असे वाटले नाही. महानगर शाखेची स्थिती अशीच असून त्यांची उदासीनता समोर आली आहे.