यवतमाळ: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र असलेल्या आर्णी तालुक्यातील जवळा येथील स्व.भारतसिंह ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ६० पेक्षा अधिक विद्यार्थी कॉपी करताना आढळले. त्यामुळे त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान, नाशिकच्या मंडळाने सलग दोनदा धाड टाकून ही मोठी कारवाई केली. यासोबतच दारव्हा, पुसद, दिग्रस येथील केंद्रांवरही या पथकाने कारवाई केली.
एकीकडे शिक्षण विभागाकडून दहावी, बारावीसाठी कॉपीमुक्त धोरण राबविले जात असताना मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावर मात्र सर्रास कॉपी होत असल्याचे या प्रकाराने स्पष्ट झाले. आर्णी तालुक्यातील खंडाळा मार्गावरील जवळा येथे स्व.भारतसिंह ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र आहे. या ठिकाणी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा घेतल्या जात आहे. या परीक्षा १७ जूनपर्यंत चालणार आहेत.
दरम्यान या केंद्रावर परीक्षेत कॉपी होत असल्याची गोपनीय माहिती नाशिक मंडळाला मिळाल्यानंतर दोन वाहनातून आलेल्या आठ ते दहा अधिकाऱ्यांच्या पथकाने येथे धाड टाकली. त्यांनी वेगवेगळ्या कक्षातील परीक्षार्थींची झाडाझडती घेतली. काही कळायच्या आतच त्यांनी परीक्षेदरम्यान, ६० पेक्षा जास्त कॉपीबहाद्दरांना रंगेहात पकडून निलंबित केले. ही कारवाई ४ व ५ जून रोजी करण्यात आली.
या महाविद्यालयात जवळपास अडीच हजारांहून जास्त विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, एमबीए व अन्य विद्याशाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. १ जूनला रद्द झालेली एमए पहिल्या वर्षाची परीक्षा १२ जूनला घेण्यात आली. या परीक्षेसाठी सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात तब्बल १ हजार ४०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या केंद्रात सलग दोन दिवस कॉपी चालल्याचे पुढे आल्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या नाशिक पथकातील पाच कर्मचाऱ्यांनी येथे दिवसभर ठाण मांडले. सकाळी १० ते ४ या वेळेत पार पडलेल्या परीक्षेदरम्यान पूर्ण वेळ हे पथक सक्रिय होते. त्यांची उपस्थिती असल्याने याठिकाणी कॉपीसारखा प्रकार घडला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केंद्राचालकावर आगपाखड केल्याची चर्चा आहे.
मुक्त विद्यापीठाच्या पथकाने केंद्रावर धाड टाकून कारवाई केली. मात्र ६० नव्हे, तर ३२ विद्यार्थ्यांना निलंबित केल्याची माहिती या संस्थेचे संचालक अ. भा. ठाकूर यांनी दिली. केंद्रावर कॉपी करण्यास आम्ही प्रतिबंध करतो, मात्र परीक्षेत कॉपी करण्याचा विद्यार्थ्यांचा स्थायीभाव आहे. त्याला रोखणे अवघड असल्याची प्रतिक्रिया ठाकूर यांनी दिली.
अन्य केंद्राची झाडाझडती आवश्यक
जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची (शिक्षण मदत केंद्र) अभ्यासकेंद्रे अनेक ठिकाणी आहेत. शिक्षणाच्या प्रवाहातून मागे पडलेले विद्यार्थी दूरस्थ शिक्षणातून सुशिक्षित व्हावे, हा हेतू मुक्त विद्यापीठाचा आहे. परंतु, ‘मुक्त विद्यापीठाच्या केंद्रावर केवळ प्रवेश घ्या आणि परीक्षेला या, कॉपी करून उत्तीर्ण व्हा’, अशी हमी केंद्रचालक विद्यार्थ्यांना देत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. बहुतांश केंद्रांवर परीक्षेत कॉपी होत असल्याच्या प्रकारामुळे मुक्त विद्यापीठाच्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात आहे. जवळा येथील केंद्रात सुरु असलेल्या कॉपीसारख्या प्रकाराने विद्यार्थ्यांच्या या धारणेला खरे ठरविले आहे. त्यामुळे अन्य अभ्यासकेंद्रावरही झाडाझडती घेणे आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे.