यवतमाळ : पतीच्या एका प्राध्यापक मित्राने विवाहितेस पेढ्यात गुंगीचे औषध देऊन तिचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले. त्यानंतर ते सार्वत्रिक करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केला. पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विजेंद्र जाधव (४०, रा.यवतमाळ) असे आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. घटनेनंतर पीडित विवाहितेने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली.

पीडित विवाहित ही पती व दोन मुलांसह अवधूतवाडी पोलीस ठाणे हद्दीत राहते. आरोपी विवाहितेच्या पतीचा चांगला मित्र असून तो घराशेजारी राहतो. जानेवारी महिन्यात पीडित विवाहिता घरी एकटीच असताना विजेंद्र तिच्या घरी आला. त्यानंतर त्याने प्रसाद म्हणून पेढा खायला दिला. पेढा खाल्ल्यानंतर विवाहितेला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली. काही वेळाने जाग आल्यानंतर आरोपी विजेंद्र हा घरातच बसून होता. यावेळी त्याने विवाहितेला तू मला खूप आवडते, तुझ्याशी संबंध ठेवायचे आहे, म्हणून तुझे फोटो काढले, असे तिला सांगितले. तसेच शारीरिक संबंध करू दिले नाही तर हे फोटो नवऱ्याला दाखवेन व सार्वत्रिक करेन, अशी धमकी देवून तो निघून गेला. त्यांनतर काही दिवसांनी विवाहिता ही घरी एकटीच असताना फोटो सार्वत्रिक करण्याची धमकी देऊन तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही त्याने अनेकदा विवाहितेवर अत्याचार केले.

हेही वाचा – नागपूर : मतदानानंतर तब्बल २५ दिवसांनी भाजपचा मतदार यादीवर आक्षेप, काय आहे प्रकरण?

हेही वाचा – चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, बल्लारपूर तालुक्यातील घटना

२३ मार्च रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास पती नसताना विजेंद्रने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र विवाहितेने आरडाओरडा केला व मुले जागी झाल्याने तो पसार झाला. बदनामी होईल या भीतीने पीडितेने आजपर्यंत तक्रार दिली नाही. मात्र, मंगळवारी तिने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.