यवतमाळ : समाजातील वाचनसंस्कृती नष्ट होत असल्याची ओरड सर्वत्र सुरू आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले असतात. एकूणच पुस्तके, वाचन याकडे ओढा कमी होत असताना यवतमाळ येथील भूमिका सूजीत राय या आठव्या इयत्तेतील दृष्टिहीन विद्यार्थिनीने सलग १२ तास वाचन करून, वाचनाप्रति डोळस संदेश समाजाला दिला.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भूमिकाने रविवारी स्थानिक डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेत हा उपक्रम पूर्णत्वास नेला. मोबाईल युगात वाचन संस्कृती जिवंत राहावी, या हेतूने दिव्यांगासाठी तयार केलेल्या ब्रेल लिपीतील पुस्तकांचे सकाळी ८ वाजेपासून सलग १२ तास वाचन केले. दृष्टिहीन असल्याची खंत न बाळगता अतिशय प्रामाणिक जीवन घडवण्यासाठी प्रयत्न करुन, जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे ध्येय भूमिकाने बाळगले आहे.

हेही वाचा – बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड

जन्मानंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय उपचारादरम्यान भूमिकाची दृष्टी गेली होती. तेव्हापासून तिचे आई-वडील तिला प्रत्येक गोष्टीत सहकार्य करतात. तिचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी तिचे पालक कायम प्रयत्नशील आहेत. स्थानिक नंदूरकर विद्यालयात भूमिका सध्या आठव्या वर्गात शिकत आहे. या शाळेतील ती एकमेव दृष्टीहीन विद्यार्थिनी आहे. तिला बालपणापासूनच वाचनाचा छंद जडला. ब्रेल लिपीतून ती वाचन करत असल्याने तिचे वडील तिला कायम वेगवेगळी पुस्तके वाचनासाठी आणून देतात. तिचे वर्गशिक्षक जयंत चावरे यांनीही भूमिकाचे वाचन ही विद्यार्थ्यांसाठी प्ररेणादायी असल्याचे सांगितले. भूमिका ही बालपणापासून दृष्टिहीन असली तरी सर्वगुण संपन्न आहे. तिचे प्रशासकीय सेवेतून जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्र आहे. तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालक म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत, असे भूमिकाचे वडील सुजित राय म्हणाले.

हेही वाचा – नाशिक : कुंभमेळा तयारीसाठी लवकरच स्थानिक पातळीवर बैठक, संशयास्पद भूसंपादनाची चौकशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भूमिकाने डॉ. एपीजे अब्दूल कलाम अभ्यासिकेत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून रविवारी सकाळी ८ वाजता वाचनाला सुरूवात केली. रात्री आठ वाजेपर्यंत ब्रेल लिपीतील छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम, साई अर्पण, एटू लोकांचा देश्‍, शालेय निंबधमाला, मजेशीर गोष्टी, मोर पिसे अशा विविध १३ पुस्तकांचे सलग वाचन केले. यावेळी तिचे कौतुक करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागडे, तहसीलदार डॉ. योगेश देशमुख, समाजकल्याण अधिकारी चव्हाण, डायटचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, नंदुरकर विद्यालयातील शिक्षकांनी भेट दिली. शहरातील दहावी, बारावीच्या दीडशेवर विद्यार्थ्यांनी या उपक्रमास भेट देवून भूमिकाकडून वाचनाची प्रेरणा घेतली.