यवतमाळ : पराभूत होण्याची ‘हॅटट्रिक’ होवूनही जिल्ह्यात केवळ पाच नेत्यांच्या हातात असलेल्या काँग्रेस पक्षाची सुत्रे दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या हातात सोपवावी अन्यथा आम्हाला अन्य पर्याय निवडावा लागेल, असा सज्जड इशारा रविवारी येथे झालेल्या चिंतन बैठकीत तरूण काँग्रेस नेत्यांनी पक्षाला दिला.
जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी ‘पुत्र पुनर्वसन केंद्र’ सुरू केले असून, कार्यकर्त्यांनी मरेपर्यंत सतरंज्याच उचलतच राहायच्या का, असा संतप्त प्रश्नही या बैठकीत अनेकांनी उपस्थित केला.
येथील आर्णी मार्गावरील एका हॉटेलमध्ये झालेल्या या बैठकीसाठी जिल्हाभरातून काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील २०० वर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दुसऱ्या फळीतील अनेक नेत्यांनी यावेळी भावनांना यावेळी वाट मोकळी करून दिली. जिल्ह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, प्रा. वसंतराव पुरके, वामनराव कासावार आणि आता विद्यमान आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यात येणार आहेत. हेच नेते कोणाला तिकीट द्यायचे हे ठरविणार असल्याने सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात न्याय मिळणार नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. पाच नेतेच म्हणजे जिल्ह्यातील संपूर्ण काँग्रेस आहे का, असा प्रश्न योवळी अनेकांनी उपस्थित केला. ज्या पदांवर कार्यकर्त्यांना, दुसऱ्या फळीतील नेत्यांना संधी द्यायला हवी, अशी सर्वसामान्य पदेही हेच वरिष्ठ नेते काबीज करून असल्याने आम्ही कुठे जायचे, असा सवाल यावेळी कार्यकर्त्यांनी विचारला.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते नेतृत्व गुण नसलेल्या आपल्या मुलांसाठी, त्यांना पदे मिळावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. हीच ताकद नेत्यांनी पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे लावली तर, काँग्रेसलाही अच्छे दिन येईल, असा विश्वास यावेळी तरूण नेत्यांनी व्यक्त केला. वरिष्ठ नेते जनसामान्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करण्याऐवजी पक्षांतर्गत वाद वाढतील यासाठी सक्रिय राहत असल्याचा आरोपही अनेकांनी केला.
येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीा होणार आहे. त्या अनुषंगाने इतर सर्व राजकीय पक्षांनी तयारी चालविली असताना काँग्रेसमध्ये सर्वत्र सामसूम आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जिल्ह्यातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना राजकारणात सक्रिय होवू देत नसल्याने जिल्ह्यात काँग्रेस पक्ष रसातळाला गेला आहे, असा आरोप या बैठकीत नेत्यांनी केला. पक्षाची सातत्याने घसरण होत असताना पक्ष नेतृत्वालाही स्थानिक ज्येष्ठांचे नेतृत्व बदलवासे वाटत नाही, हे आश्चर्यजनक आहे. जे नेते सातत्याने पराभूत होत आहेत, ते कार्यकर्त्यांसमोर कोणता आदर्श ठेवणार, असा संतापही अनेकांनी व्यक्त केला.
मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अनेक ज्येष्ठांनी गद्दारी केली, पक्षाच्याच उमेदवारासाठी पाडापाडीचे राजकारण केले. पक्ष नेतृत्वाने अशा गद्दारांना घरी बसवून नवीन नेतृत्वास संधी द्यावी. अन्यथा आमच्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी अन्य पर्याय स्वीकारावा लागेल, असा इशाराच या बैठकीत अनेकांनी दिला. बैठकीला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, माजी सभापती देवानंद पवार, अरूण राऊत, शिवाजी सवनेकर, प्रकाश मानकर, राजू गावंडे आदीसंह प्रत्येक तालुक्यातील दुसऱ्या फळीतील पदाधिकारी उपस्थित होते.