यवतमाळ : तुरीच्या शेतात चक्क गांजाची लागवड करून मिश्र पीक घेणाऱ्या शेतकऱ्याचा प्रयत्न पोलिसांच्या कारवाईने फसला. गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महागाव तालुक्यातील डेहणी शिवारातील शेतकऱ्याच्या शेतात कारवाई करून गांजाची ११३ झाडे जप्त केली. या गांजाचे वजन ९४ किलो असून त्याची किंमत सुमारे दोन लाख ४८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी शेतकरी प्रदीप पांडू आडे (४५, रा. धानोरा तांडा, ता. महागाव) याला अटक करण्यात आली आहे. या शेतकऱ्याने शेतात तुरीच्या पिकाबरोबर गांजाची लागवड केली. पोलिसांपासून संरक्षण करण्यासाठी ही झाडे तुरीच्या झाडांमध्ये लपवण्यात आली होती. पोलिसांना याची खबर लागल्यावर रेकी करून खात्री करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी डेहणी शिवारातील या शेतात छापा टाकला. यावेळी तुरीच्या पिकात लागवड करण्यात आलेली ११३ गांजाची झाडे जप्त करण्यात आली. ओला गांजा जप्त करून त्याची बाजारभाव किंमत दोन लाख ४८ हजार रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप थोरात, एलसीबीचे प्रमुख सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संतोष मनवर, पवन राठोड, जमादार अजय डोळे, मिथुन जाधव, बबलू चव्हाण, निलेश राठोड, योगेश गटलेवार, सोहेल मिर्झा, अमित झेंडेकर, किशोर झेंडेकर आदींनी केली.
गांजा उत्पादन यवतमाळातच
एलसीबी पथकाने आठ दिवसांपूर्वी फुलसावंगी शिवारातील गांजाची शेती उघड केली होती. त्यानंतर याच परिसरात ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली. गांजा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी कडवी नजर ठेवली आहे. पूर्वी हा गांजा तेलंगणा, आंध्रप्रदेश, ओरिसा राज्यातून येत असल्याचे सांगितले जात होते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातच गांजा लागवड होत असल्याचे या कारवाईनंतर स्पष्ट झाले. पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात दोन गांजा उत्पादकांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या कारवाईनंतर जिल्ह्यातील विविध भागात होणारी गांजा विक्री थांबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी पारंपरिक पीक घेऊन कायम आर्थिक विवंचनेत असतात. शिवाय नैसर्गिक संकटांनी ही पिके हातातून निघून जातात. या मानसिकतेतून तर शेतकरी गांजा पिकाकडे वळले नाही ना, अशी चिंता व्यक्त होत आहे.
