यवतमाळ : भारतात दरवर्षी जवळपास ७० हजार महिलांचा प्रसुतीनंतरच्या रक्तस्त्रावामुळे मृत्यू होतो. यात रक्तक्षय (ॲनिमिया) हे प्रमुख कारण आहे. महिलांमधील रक्तक्षय रोखण्यासाठी यवतमाळ तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीने पुढाकार घेत गावाला रक्तक्षय मुक्त करण्याचा निर्णय घेतला. ग्रामसभेमध्ये तसा ठरावच घेण्यात आला. महिलांच्या आरोग्याची काळजी घेत गाव रक्तक्षयमुक्त करण्यासाठी ग्रामसभेने निर्णय घेण्याचा हा जिल्ह्यातील पहिलाच प्रसंग आहे.
‘ॲनेमिया फ्रि इंडिया फोरम’ अंतर्गत यशदा पुणे व सहाय्यक ट्रस्ट, तसेच सहजिवन फाऊंडेशन मार्फत रक्तक्षय (ॲनिमिया) मुक्त गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी धामणी ग्रामपंचायतमध्ये शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत रक्तक्षयामुळे महिलांना होणारे आजार, त्याचे धोके यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत सहजिवन फाऊंडेशन संस्थेच्या अध्यक्ष सपना बावनेर यांनी रक्तक्षयमुक्त गाव ही संकल्पना मांडली. रक्तक्षय भारतातील महिलांमध्ये एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, १५ ते ४९ वयोगटातील ५७ टक्के महिला रक्तक्षयग्रस्त आहेत. हा आजार रोखण्यासाठी लोहयुक्त आहार आणि घरातील परसबागेचे महत्व, शरीरामध्ये रक्त कमी होण्याचे दुष्परीणाम, पांढऱ्या पेशी व लाल पेशींबद्दल सविस्तर माहिती यावेळी सपना बावनेर यांनी दिली. रक्तक्षय आजार समूळ संपवायचा असेल तर सेंद्रिय पोषण परसबागेची निर्मिती तसेच त्यातील पालेभाज्यांचा आहारात समावेश होणे गरजेचे आहे, असे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी सर्वानुमते धामणी गावाला रक्तक्षयमुक्त करण्याची शपथ घेवून तसा ठरावच ग्रामसभेने पारित केला, अशी माहिती सरपंच सोनल कैलास अंजिकर यांनी दिली.
या बैठकीत अनेमियामुक्त गाव करण्यासाठी वर्षभराचे नियोजन करण्यात आले. रक्तक्षयमुक्त कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामपंचायत अधिकारी एस.बी. ताटेवार यांनी केली. बैठकीला उपसरपंच मनीषा देशमुख, अर्चना उर्फ अंजना पिपरे, विष्णू बोरकर, विनोद मेश्राम, प्रीती कोराटे, बाबाराव राठोड, मैना चव्हाण, सचिव सुधाकर पवार, रविंद्र आदमणे, चेतन पावडे, अंगणवाडी ताई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
रक्तक्षय (अॅनिमिया) प्रतिबंध कसा करावा?
महिला प्रकृतीकडे दुलर्क्ष करून सतत काम करतात. स्वत: पोषक आहार न घेणे, शीळे अन्न खाणे, पुरेशी झोप न, पाण्याची कमतरता, कृमी अशा विविध कारणांनी महिलांना रक्तक्षय अधिक प्रमाणात होतो. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी लोह(आयर्न) युक्त आहार घेणे आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, डाळी व कडधान्ये, सुकामेवा, मांस, अंडी, गूळ, तीळयुक्त पदार्थ व्हिटॅमिन ‘सी’ असलेली फळे, अंडी, दूध, दही, चीज, मासे, अंकुरलेली धान्ये व भिजवलेल्या कडधान्यांचा वापर केल्यास रक्तक्षयापासून बचाव होवू शकतो. अन्न लोखंडी भांड्यात शिजवणे, कृमिनाशक औषधे वेळोवेळी घेणे, गर्भवती महिलांनी लोहयुक्त आहार व औषधांचा वापर करणे, शारीरिक थकवा, थंडी, चक्कर, त्वचेला पांढरटपणा जाणवल्यास त्वरित तपासणी करणे, ही पथ्ये पाळल्यास रक्तक्षयापासून बचाव होवू शकतो, असे डॉक्टर सांगतात.