यवतमाळ : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात तापमानात घट होत असून, विदर्भातील सर्वात कमी तापमानाची नोंद सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात झाली. सलग तिसऱ्या दिवशीही थंडीचा जोर कायम असून मंगळवारीसद्धा पारा ९.६ अंशावरच स्थिरावला होता. जिल्हा थंडीने गारठला असून शनिवारपासून पारा थेट १२ अंशावरून ९ अंशापर्यंत खाली घसरला. हवामान विभागाने ही लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
गेल्या १५ वर्षात नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद सोमवार १७ व मंगळवार १८ नोव्हेंबर रोजी झाली आहे. डिसेंबर महिन्यातील थंडीचा कडाका यावेळी नोव्हेंबर महिन्यातच जाणवू लागला आहे. दीर्घकाळ लांबलेला पाऊस आणि त्यानंतर आलेली थंडी यामुळे हुडहुडी वाढली आहे. थंडीची ही लाट आरोग्यावर विपरित परिणाम करणारी आहे. त्यामुळे दिवसाही उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे.
या तीव्र शीतलहरीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर आले असून, ‘काय करावे, काय करू नये’ बाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आणखी काही दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उबदार कपडे वापरावेत. घरात आवश्यक औषधांचा साठा तयार ठेवावा.
थंडीत महत्त्वाचे म्हणजे, रात्रीच्या वेळी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे आणि थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळण्यासाठी अनावश्यक प्रवास कमी करावा. प्रशासनाने वृद्ध व्यक्ती, लहान मुले तसेच श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. थंडीमुळे शहरात रात्री रस्ते ओस पडत असून, सर्वत्र शेकोटी पेटवून नागरिक ऊब घेण्याचा प्रयत्न करत आहे. या थंडीमुळे शहरातील तिबेटियन स्वेटर विक्रेत्यांची बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे.
‘फ्रॉस्टबाइट‘मध्ये मालिश टाळा
बधिरपणा, बोटे, कान पांढरे पडणे याला ‘फ्रॉस्टबाइट’ म्हणतात. थंडीत ही लक्षणे दिसल्यास, त्या भागाची मालिश करू नये. अती थंडीमुळे शरीरात कंपन निर्माण होतात. याला ‘हायपोथर्मिया’ म्हणतात.
‘हायपोथर्मिया’ बाधित व्यक्तीला उबदार ठिकाणी ठेवावे, कोरड्या चादरीत गुंडाळावे व गरम पेय द्यावीत. शरीर कोरडे ठेवावे, ओले कपडे त्वरित बदलावेत. श्वास वाढल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. थंडीच्या काळात नागरिकांनी मद्यपान टाळावे, तसेच, थंडीमुळे शरीरात कंपन निर्माण झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण हे शरीरातील उष्णता कमी होण्याचे पहिले लक्षण असू शकते. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
