यवतमाळ : शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या ‘सातबारा कोरा’ पदयात्रेचा समारोप प्रसंगी जिल्ह्यातील महागाव तालुक्यात अंबोडा येथे जाहीर सभा झाली. यावेळी जमलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे जवळपास तीन तास असंख्य वाहने रस्त्यावर अडकून पडली आणि वाहनधारकांची, प्रवाशांची गैरसोय झाली. शेतकऱ्यांसाठी काढलेल्या ‘सात-बारा कोरा’ पदयात्रेचा समारोप थेट राष्ट्रीय महामार्गावर केल्याप्रकरणी बच्चू कडू आणि त्यांच्या १२ साथीदारांवर महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महागाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक देवानंद शिवाजी कायंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘सात-बारा कोरा’ पदयात्रा अमरावती, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात फिरली. सोमवारी या यात्रेचा समारोप महागाव तालुक्यातील आंबोडा गावातील श्री गजानन महाराज मंदिरात होणार होता. त्या ठिकाणी सभेची सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी ऐनवेळी या सभेचे नियोजन रद्द करून जाहीर सभा थेट नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील उडाणपुलावरच सभा भरवली.
महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला. या प्रकारामुळे नागपूर-तुळजापूर महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. पोलिसांनी या प्रकरणी, ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू रा. अचलपूर जि. अमरावतील यांच्यासह गणेश दादाराव ठाकरे, आकाश भाऊराव पावडे, रामेश्वर विठ्ठल कदम, सचिन प्रकाश राऊत, बंडू लहुजी वाघमारे, सुनील देविदास पावडे, सदानंद राऊत, पप्पू विश्वनाथ करपे, शेख रियाज, योगेश तायडे, शुभम खेडे सर्व रा. आंबोडा, ता. महागाव यांच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले.
सभेला आंबोड्यातील मंदिरात परवानगी असताना ही सभा राष्ट्रीय महामार्गावर घेण्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे. महामार्गावर सभा घेण्यासाठी परवानगी दिली नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पदयात्रेदरम्यान कार्यकर्त्यांना रस्त्याच्या एका बाजूने चालण्याची वारंवार सूचना देऊनही या सूचनेचे पालन आंदोलनकर्त्यांनी केले नाही. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. पाच ते सात हजार लोकांचा जमाव आणि ३० ते ४० ट्रॅक्टर रस्त्यावर आडवे लावून बेकायदेशीरपणे महामार्ग अडवण्यात आला.
कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता वाहतूक थांबवून लोकांची गैरसोय केली आणि नियमांचे उल्लंघन केल, असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. या कारणांमुळे, बेकायदेशीरपणे जमाव जमवून राष्ट्रीय महामार्ग रोखल्याप्रकरणी बच्चू कडू आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.