यवतमाळ : शहरातील खराब रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या समस्येवर प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने, ‘यवतमाळचा राजा परिवार’ या सामाजिक संस्थेने गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला ‘खड्डे बुजवा’ आंदोलन केले.
आज बुधवारी सर्वत्र गणपतीचे थाटात आगमन होत आहे. मात्र बाप्पांच्या या आगमनाला शहरातील खड्डेमय रस्त्यांचे विघ्न आहे. या रस्त्यांवरून बाप्पाला मंडपापर्यंत सुखरूप कसे न्यायचे, ही समस्या निर्माण झाली आहे. भूमिगत गटार योजनेच्या कंत्राटदारांनी शहरातील रस्त्यांची चाळणी केली आहे. पावसाळ्यात शहरातील नागरिक वाहने इतरत्र ठेवून पायी घरी जातात. पण, लोकप्रतिनिधींचे कंत्राटदारांशी असलेले हितसंबंध, सुस्त नगर परिषद प्रशासन यामुळे यवतमाळांवरील खड्डेमय रस्त्यांचे विघ्न दूर होण्याची चिन्हं नाहीत. अशातच गणेशाचे आगमन होत असतानाही सुखकर्ता म्हणणाऱ्या बाप्पालाही या विघ्नातून जायची वेळ आली आहे.
बाप्पाचे आगमन खाच खळग्यातून होऊ नये म्हणून येथील ‘यवतमाळचा राजा’ परिवाराच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गातील गड्डे बूजवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. प्रशासनाचा दुर्लक्षित धोरणाचा निषेध करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांना या संदर्भात निवेदन देऊन खड्डे बूजवण्याची मोहीम हातात घेण्यात आली आहे. आज गणपतीची स्थापना होत असतानाच, गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे स्वतःहून बुजवण्यास सुरुवात केली. यासोबतच, प्रशासकीय अनास्थेचा तीव्र निषेध करत, यापुढे कोणत्याही प्रकारचा कर न भरण्याचा आणि भविष्यातील निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा यवतमाळचा राजा परिवाराचे अध्यक्ष मनोज पसारी यांनी दिला आहे.
यवतमाळचा राजा परिवार संतप्त
गेल्या ६२ वर्षांपासून यवतमाळच्या जनतेसाठी सामाजिक उपक्रमांमध्ये ‘यवतमाळचा राजा’ गणेशोत्सव मंडळ परिवार अग्रेसर आहे. कोरोना काळात अन्नदान, रुग्णसेवा, वस्त्रदान, रक्तदान यांसारखी अनेक महत्त्वाची कामे या मंडळाने केली. गेल्या काही वर्षात यवतमाळ शहराची ख्याती ‘खड्ड्यांचे शहर’ अशी झालेली आहे. स्थानिक प्रशासनाची उदासीनता यामुळे यवतमाळ का राजा परिवार संतप्त झाला आहे. शहरातील खराब रस्त्यांविषयी प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे मंडळाने पुढाकार घेऊन शहरातील महत्त्वाच्या खड्ड्यांची डागडुजी सुरू केली. यवतमाळचा राजा परिवाराने सरदार चौक, तहसील चौक, टांगा चौक, गांधी चौक, लोखंडी पूल, माळीपुरा, बालाजी चौक, मारवाडी चौक या परिसरातील रस्ते बुजविण्याचे काम केले. जिल्ह्यामध्ये तीन मंत्री असूनही शहराची अवस्था बिकट आहे आणि प्रशासनाकडून मानाच्या गणपतीचाही मान राखला जात नाही, अशी भावना परिवाराच्या सदस्यांनी व्यक्त केली.