यवतमाळ : मुख्याध्यापिकेने स्वतःच्याच शाळेत शिक्षक असलेल्या पतीची विष देऊन हत्या केल्याच्या घटनेला या दोघांमधील पदांच्या वर्चस्वाची किनार असल्याची चर्चा आहे. निधी जन्मत: पोलिओग्रस्त असल्याचे शंतनूच्या नातेवाईकांनी सांगितले. तरीही शंतनूने निधीसोबत प्रेमविवाह केला. तो तिच्याबाबत अत्यंत हळवा होता. पण, तिने अत्यंत क्रूरपणे त्याला संपविल्याची सल शंतनूच्या नातेवाईकांना आहे.
मृत शंतनू देशमुख आणि त्याची आरोपी पत्नी निधी देशमुख हे लोहारा येथील सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक होते. हे दोघे सक्रिय शिक्षक म्हणून शाळेत परिचित होते. निधी शाळेची मुख्याध्यापक होण्यापूर्वी शंतनू हाच शाळेचा सर्व कारभार बघायचा. मुलांचा आवडता शिक्षक म्हणून त्याच्याकडे बघितले जायचे. दरम्यान निधी या शाळेत आल्यानंतर तिने आपल्या कार्यपद्धतीने संस्थाचालक, विद्यार्थी, पालक या सर्वांचा विश्वास संपादन केला. निधीचा स्वभाव सर्वांवर प्रभाव टाकणारा असल्याने ती अल्पावधीत विद्यार्थीप्रिय झाली.
जवळपास तीन वर्ष निधी आणि शंतनू शाळेत सोबत होते. त्यावेळी निधी लोहारा भागात खोली करून एकटी राहत होती. शाळेत सोबत असल्याने निधी आणि शंतनू एकमेकांना आवडू लागले आणि त्यांनी मार्च २०२४ मध्ये प्रेमविवाह केला. मात्र दोघांनीही लग्न केल्याची माहिती बरेच दिवस कुटुंबीयांपासून लपवून ठेवल्याचे सांगण्यात येते. शंतनूने निधीसोबत लग्न केल्याची माहिती कुटुंबीयांना दिली तेव्हा त्यांनी कुठलीही हरकत न घेता त्यांचे नाते स्वीकारले. मात्र निधीला पतीसोबत स्वतंत्र रहायचे असल्याने ते दोघे भाड्याच्या घरात वेगळे रहायचे.
लग्नानंतर मात्र लग्नापूर्वीच्या अनेक गोष्टी बदलल्याची चर्चा शंतनूच्या नातेवाईकांमध्ये आहे. निधी शाळेत मुख्याध्यापक झाल्यानंतर शंतनू शाळेतील महत्वाच्या भूमिकेतून बाजूला पडला. निधीने संपूर्ण सूत्र हाती घेतल्याने ती शंतनूलाही इतर शिक्षकांसारखीच सामान्य वागणूक देत असल्याचे त्यांचे सहकारी सांगतात. शाळेत मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीचा त्यांच्या नात्यावर परिणाम झाल्याची चर्चा आहे. निधी महत्त्वाकांक्षी असल्याची कल्पना शंतनूला होती. ती घरी मुलांची शिकवणी घ्यायची. ज्या तीन विद्यार्थ्यांचा तिने शंतनूच्या हत्येनंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापर केला ते विद्यार्थी निधीसाठी खास होते, अशी चर्चा आता त्यांचे वास्तव्य असलेल्या परिसरात आहे. हे तिन्ही विद्यार्थी सामान्य कुटुंबातील आहेत. मात्र त्यांच्याशी निधीची असलेली सलगी शंतनूला पटत नव्हती, अशी चर्चा आहे.
निधीचे शाळेत वाढलेले वर्चस्व, शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांशी सलगी या गोष्टी सलत असलेला शंतनू मित्रांसोबत अनेकदा दारू पिऊन यायचा. दारू प्यायल्यानंतर शंतनू सैतान व्हायचा अशी माहिती निधीने चौकशीत दिल्याचे समजते. निधीसोबत संसारात आणि शाळेत वावरताना शंतनूच्या डोक्यात संशयाचे भूत शिरले, त्यातून दोघांच्या संसारात वादाने प्रवेश केला आणि एका प्रेमविवाहाचा दुःखद आणि क्रूर शेवट झाला, अशी चर्चा आहे.
निधीला न्यायालयीन कोठडी
चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर निधीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीत निधीकडून अनेक गोष्टींचा उलगडा करून पोलिसांनी आवश्यक पुरावे गोळा केले. निधीने शंतनूचा फेकलेला मोबाईल सापडला नाही. मात्र शंतनूचा लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला. सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड आदी पुरावे गोळा केले. त्यांचे विश्लेषण करून पोलीस दोषारोपपत्र दाखल करणार आहेत. दरम्यान शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा असल्याची माहिती तपास अधिकारी, लोहारा पोलीस ठाण्याच्या निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांनी दिली.