यवतमाळ : महागाव तालुक्यात फुलसावंगी परिसरात आज सोमवारी दुपारी अवकाळी पावसाने थैमान घातले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसात टेंभी शिवारातील शेतात काम करणाऱ्या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. तर तिच्यासोबत असलेली दुसरी महिला गंभीर भाजली आहे.

विमलबाई किसन भिसे (३५, रा. पिंपळगाव ईजारा) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या शेतातील हळदीचा सर्वा वेचण्यासाठी इतर महिलांसोबत शेतात गेल्या होत्या. यावेळी अचानक वातावरण बदलले आणि विजांसह जोरदार पाऊस सुरू झाला. याच दरम्यान विमलबाई यांच्यावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेली उषा प्रल्हाद मेंढके ही महिला गंभीर भाजली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे पिंपळगाव गावात शोककळा पसरली असून, मृत महिलेच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवकाळी पावसामुळे फुलसावंगी परिसरातील तिळ, भुईमूग व ज्वारी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक रस्त्यांवर मोठी झाडे कोसळल्याने वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती.

२९ जनावरे दगावली

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत विविध ठिकाणी झालेल्या वादळी पावसाने सर्वत्र मोठे नुकसान केले. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये या वादळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवली. जवळपास ५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ८२ घरांची पडझड झाली आहे. शनिवारपासून जिल्ह्यातील विविध भागात वादळी पाऊस कोसळत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाट पावसाने हजेरी लावली. दिवसभर कडक ऊन तापत असून, सायंकाळी आभाळ अचानक भरून येते आणि वादळी पाऊस कोसळतो. यवतमाळसह वणी, दारव्हा, केळापूर, मारेगाव, कळंब, नेर, वणी या आठ तालुक्यांना पावसाचा फटका बसला. या तालुक्यात ८२ घरांची पडझड झाली. बाभूळगाव, दारव्हा, केळापूर तालुक्यांतील २२ गावांमधील ४९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या पावसामुळे तीळ, भूईमुंग, ऊस, उन्हाळी ज्वारी, संत्रा, केळी आदी पिकांना मोठा फटका बसला. विविध ठिकाणी २९ जनावरांचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे.

मारेगाव येथे रविवारी सायंकाळी २२ शेळ्या वीज कोसळल्याने ठार झाल्या. तर दारव्हा तालुक्यात तीन, महागाव तालुक्यात एक आणि उमरखेड तालुक्यात २ जनावरे वीज कोसळल्याने ठार झाले. जिल्ह्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या नुकसानीचा पंचनामा करून, सर्व्हे करण्याची मागणी होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.