यवतमाळ – राजस्थान विधानसभेकडून २५ व २६ जानेवारी रोजी आयोजित राष्ट्रीय युवा पर्यावरण संसदेमध्ये यवतमाळ येथील यश मंजुश्री किशोर चव्हाण या विद्यार्थ्याने ‘बेस्ट रिसर्च फॉर कंटेंट अवॉर्ड’ पटकाविला. यश याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत देशभरातील नामवंत विद्यापीठाच्या एकूण १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातून ३० विद्यार्थ्यांची बेस्ट कम्युनिकेटर म्हणून निवड झाली. त्यात यशने विरोधी पक्षाची भूमिका घेत ‘एनव्हायर्मेन्ट प्रोटेक्शन अँड कन्सर्वेशन’ या विषयावर सर्वाधिक आठ मिनिटे भाषणाची संधी मिळवत हा पुरस्कार मिळवला.

यश सध्या पुण्यातील सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या माहिती तंत्रज्ञान शाखेत तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण यवतमाळ येथील सनराईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. त्यानंतर स्कूल ऑफ स्कॉलर्स, यवतमाळ येथे इयत्ता चौथी ते दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दहावीत ९२ तर बारावीत ८० टक्के गुण मिळवत त्याने शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. यश चव्हाण याचे कुटुंब मूळचे वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एकलारा गावचे असून, मागील ३५-४० वर्षांपासून ते यवतमाळमध्ये वास्तव्यास आहेत. त्याचे वडील किशोर चव्हाण हे घरगुती कापड विक्रीचा व्यवसाय करतात तर आई मंजुश्री या गृह उद्योगाद्वारे कुटुंबाला आर्थिक मदत करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रासह देशपातळीवर स्वतःचं वेगळे स्थान यशने निर्माण केशे आहे. विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग घेत १०० हून अधिक वादविवाद स्पर्धा आणि २०० हून अधिक भाषण स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य युवा वक्त्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. शिक्षणासोबतच त्याने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर प्रकाशित केले आहेत. जपानी भाषा शिकत त्यामध्ये प्राविण्य मिळवले आहे. यशच्या शिक्षणासाठी स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या व्यवस्थापनाने सहकार्य केले. पुण्यातील महाविद्यालयाने देखील त्याच्या शिक्षणासह वक्तृत्व विकासासाठी मदत केली. महाराष्ट्रातील नामवंत विद्यापीठांकडून गौरव मिळवणाऱ्या यश चव्हाण याचे या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तो आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मामा स्वप्नील देशमुख, प्रा. प्रवीण देशमुख, नंदू बुटे, प्रा. प्रवीण भोयर आदींना देतो.