यवतमाळ : सोशल मीडियावर ‘स्टाईल’ दाखविण्याच्या नादात तरुण पिढी अनेकदा कायद्याचे उल्लंघन करताना दिसते. अशाच एका घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे इंस्टाग्रामसाठी तलवारीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.
अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव वैभव मारोती टेकाम (२४, रा. शांतीनगर, राळेगाव) असे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रास्त्रांवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पाच ते सहा नोव्हेंबर दरम्यान ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत जास्तीत जास्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, ५ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राळेगाव परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वैभव टेकामने वाढदिवसानिमित्त धारदार लोखंडी तलवारीने केक कापल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याचे समोर आले. त्यावर तात्काळ कारवाई करत पथकाने त्याच्या शांतीनगर येथील राहत्या घरी छापा टाकून पंचासमक्ष एक धारदार तलवार जप्त केली. याप्रकरणी राळेगाव पोलिसांत भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय धनराज हाके, सुनिल खंडागळे, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी आणि सतीश फुके यांच्या पथकाने केली.
अलीकडच्या काळात वाढदिवस, मित्रांचे समारंभ किंवा पार्टीदरम्यान तलवारीने केक कापण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर झपाट्याने पसरला आहे. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट आणि फेसबुक रील्समध्ये “डॅशिंग”, “डेंजरस”, “गँगस्टर” अशा टॅगलाइनखाली तरुण आपली धाडसदाखल कृती दाखवण्याचा प्रयत्न करतात. या कृतींमुळे समाजात हिंसाचाराची संस्कृती रूजत आहे, तसेच कायद्याचा धाक कमी होत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे मत आहे. काही जण अशा व्हिडिओंमधून प्रसिद्धी आणि लाईक्स मिळवण्याच्या नादात स्वतःलाच कायद्याच्या जाळ्यात ओढून घेतात. वाढदिवस हा आनंदाचा क्षण असला तरी तलवारी, पिस्तुलं किंवा अन्य शस्त्र हातात घेऊन ‘सेलिब्रेशन’ करण्याचा हा विकृत ट्रेंड समाजासाठी धोकादायक ठरत आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या कृतींवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा इशारा दिला असून नागरिकांनाही जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
