Nagpur Weather Update Today: एक ते दोन आठवडे विश्रांती घेणारा मान्सून आता पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. सोमवारी राजधानी मुंबईत जोरदार पाऊस कोसळला. तर आताही राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रामुख्याने कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून याठिकाणी पावसाचा ” ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. तर येत्या २४ तासांत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी पावसाचा “येलो अलर्ट” तर काही ठिकाणी पावसाचा “ऑरेंज अलर्ट” हवामान खात्याने जारी केला आहे.
येलो व ऑरेंज अलर्ट कुठे?
मुंबई, ठाण्याला “येलो अलर्ट” देण्यात आला असून या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने या तिन्ही जिल्ह्यांना “ऑरेंज अलर्ट” दिला आहे. पुढील चार दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे.
दक्षिण मध्य व उत्तर महाराष्ट्र?
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तर सह्याद्रीच्या घाट भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये विजासह काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातील स्थिती?
मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेडमध्ये विधानसह आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भातील स्थिती?
विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात दिखील पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे.
हवामानाची स्थिती काय?
मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झाले असून, आता वातावरणीय स्थितीही पावसासाठी अनुकूल झाले आहेत. आर्द्रता वाढली असून वाऱ्यांचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण ओडिशाच्या वर हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे, तसेच उत्तर कर्नाटक ते आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत पूर्व-पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात उत्तरेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून यामुळे राज्यातील पावसाला २७ जुलैपर्यंत चालना मिळेल, असा अंदाज आहे.